(संगमेश्वर)
रत्नागिरी–नागपूर महामार्गावर मुर्शी येथील गोवरेवाडी बसथांब्याजवळ आज दुपारी डिझेल टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक जखमी झाला. ही घटना दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश आनंदा पवार (वय ३९, रा. बेडग, ता. मिरज, जि. सांगली) हा आपल्या ताब्यातील एमएच १० सीआर ५१८४ क्रमांकाचा डिझेल टँकर मिरज येथून रत्नागिरी (एसटी डेपो)कडे घेऊन जात होता. मुर्शी पोलीस चौकीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर सांडले.
अपघातात चालक सुरेश पवार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सुतार, महिला हेड कॉन्स्टेबल मनस्वी कुर्ले-पावसकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेणुका कांबळे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. वेळीच उपाययोजना केल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून पुढील पोलीस कार्यवाही सुरू आहे.

