(मुंबई / वृत्तसंस्था)
नव्या कार खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. मारुतीनंतर टाटा मोटर्स, ऑडी आणि ह्युंदाईसह अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमती वाढविण्याची तयारी केली आहे. यापैकी अनेक कंपन्यांची दरवाढ १ डिसेंबरपासून लागू होणार आहे. उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आणि अन्य खर्चात झालेली वाढ हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.
वाहनांच्या उत्पादनासाठी स्टील, ॲल्युमिनियम, तांबे, प्लास्टिक, रबर, इलेक्ट्रॉनिक सुटे भाग यांसह कारागीर आणि वाहतूक खर्च करावा लागतो. या सर्व खर्चांचा एकत्रित समावेश ‘इनपुट कॉस्ट’मध्ये होतो. या खर्चात वाढ झाल्यास कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होतो. तो कमी करण्यासाठी वाहनांच्या विक्री किमती वाढविण्याचा पर्याय स्वीकारला जातो. परिणामी, वाढलेल्या खर्चाचा भार ग्राहकांवर पडतो.
टाटा मोटर्सने आपल्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या किमती ०.५ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीत इलेक्ट्रिक वाहनांसह पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचाही समावेश असेल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
ऑडी इंडियानेही वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून वाहनांच्या किमतीत २ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे जाहीर केले आहे. ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्टर बलबीर सिंह धिल्लों यांनी सांगितले की, व्यवसायाची शाश्वतता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या दरवाढीचा ग्राहकांवर कमीत कमी परिणाम व्हावा, याची खबरदारी घेण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ह्युंदाईनेही आपल्या निवडक वाहन श्रेणींच्या किमती वाढविण्याचे संकेत दिले आहेत. या दरवाढीचा परिणाम सर्व वाहनांवर होणार नसून विशिष्ट श्रेणीतील मॉडेल्सच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक वाहनाच्या प्रकारानुसार वाढ निश्चित केली जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, ही वाढ ८ हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, कंपनीने अद्याप सुधारित किमती लागू केलेल्या नाहीत.
दरम्यान, देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुतीने यंदा चौथ्यांदा वाहनांच्या किमती वाढविल्या आहेत. कंपनीने ०.३१ टक्क्यांची दरवाढ जाहीर केली असून, सुधारित दर २२ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. मात्र, विविध वाहन श्रेणींनुसार किती रुपयांची वाढ झाली आहे, याचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे डिसेंबरच्या सुरुवातीपासून होणाऱ्या अन्य कंपन्यांच्या दरवाढीमुळे कार खरेदीचे बजेटही वाढण्याची शक्यता आहे.


