(संगमेश्वर / एजाज पटेल)
डिंगणी येथे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या एका अपघाताप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी कारवाई केली आहे. एका सीएनजी गॅस टँकर चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हलगर्जीपणे चालवून कारला धडक दिली होती. या प्रकरणी ११ एप्रिल २०२६ रोजी १९:३५ वाजेच्या सुमारास टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेश लक्ष्मण वरेकर (वय ५९, रा. नाहुर, मुंबई, मूळ रा. ओरी, रत्नागिरी) हे दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास आपली मारुती रिट्झ कार (क्र. MH 03 AW 1680) घेऊन रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जात होते. डिंगणी येथील सीएनजी पंपाजवळील चढावर समोरून संगमेश्वरच्या बाजूने एक गॅस टँकर (क्र. MH 08 AP 3961) खाली उतरत होता.
समोरून येणाऱ्या टँकरला रस्ता देण्यासाठी वरेकर यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला खाली घेतली होती. मात्र, टँकर चालक संयोग प्रभाकर नागवेकर (रा. घुडे वठार, रत्नागिरी) याने रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता आणि टँकरमध्ये कोणताही क्लिनर सोबत न ठेवता वाहन वेगात चालवले. यामुळे टँकर कारच्या उजव्या बाजूला घासत गेल्याने कारचा मागील बंपर तुटून नुकसान झाले.
या अपघाताबाबत फिर्यादी यांनी उशिराने तक्रार दिल्यानंतर, संगमेश्वर पोलिसांनी दिनांक ११/०४/२०२६ रोजी १९:३५ वाजता गुन्हा दाखल केला आहे. आरोपी टँकर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा (गु.र.नं. २८/२०२६) नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे

