शासकीय कार्यालयांमधील संगणकावर व्हॉट्सॲप वेब वापरणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने महत्त्वाचा सायबर सुरक्षा इशारा जारी केला आहे. व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्राचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार संबंधित खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवू शकतात, असा धोका भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (I4C) राष्ट्रीय सायबर गुन्हे धोका विश्लेषण विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजासाठी या सुविधेचा वापर करताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन मंत्रालयाने केले आहे.
व्हॉट्सॲप वेबच्या लॉगिन सत्रावर सायबर गुन्हेगारांनी ताबा मिळवल्यास वापरकर्त्याच्या खात्यातील संदेश वाचणे, त्याच्या नावाने इतरांना संदेश पाठविणे, संपर्क क्रमांक मिळविणे आणि ग्रुपमधील संभाषणांची माहिती मिळविणे शक्य होते. अशा प्रकारच्या अनधिकृत प्रवेशाचा वापर करून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळख धारण करणे, आर्थिक फसवणूक करणे, फिशिंगच्या माध्यमातून माहिती चोरणे आणि अन्य सायबर गुन्हे करण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर शासकीय कामकाजाशी संबंधित कागदपत्रे, प्रशासकीय तपशील, आर्थिक व्यवहारांची माहिती, गोपनीय पत्रव्यवहार तसेच अन्य संवेदनशील माहितीची देवाणघेवाण व्हॉट्सॲप वेबवरून करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कार्यालयीन संगणकावर या सुविधेचे लॉगिन सत्र कायमस्वरूपी सुरू ठेवणेही टाळावे. प्रत्येक वापरानंतर खात्यातून लॉगआऊट करणे आवश्यक असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
व्हॉट्सॲप खात्यातून आपल्या नकळत संदेश पाठविले जाणे, संपर्कातील व्यक्तींकडून अनपेक्षित प्रतिसाद मिळणे किंवा खात्यावर संशयास्पद हालचाली दिसून येणे, ही सायबर घुसखोरीची संभाव्य चिन्हे असू शकतात. अशा प्रकारच्या घटनांकडे दुर्लक्ष न करता तातडीने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय सार्वजनिक संगणक, सायबर कॅफे, हॉटेलमधील बिझनेस सेंटर किंवा अविश्वसनीय संगणकांवरून व्हॉट्सॲप वेबचा वापर करू नये, असेही सूचित करण्यात आले आहे. कार्यालयीन संगणकांची ऑपरेटिंग सिस्टिम, इंटरनेट ब्राउझर आणि सुरक्षा प्रणाली नियमितपणे अद्ययावत ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. अनोळखी फाइल्स, संशयास्पद डाउनलोड, क्रॅक सॉफ्टवेअर आणि अविश्वसनीय स्रोतांमधून आलेल्या फाइल्स उघडणे टाळावे, असेही मंत्रालयाने बजावले आहे.
शासकीय माहितीची गोपनीयता कायम राखणे, कार्यालयीन पत्रव्यवहार सुरक्षित ठेवणे आणि डिजिटल यंत्रणांचे संरक्षण करणे यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायबर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे. डिजिटल माध्यमातून संवाद साधताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.


