(पालघर / वृत्तसंस्था)
समुद्रकिनाऱ्याकडे फिरण्यासाठी निघालेल्या तीन महाविद्यालयीन तरुणांचा बोईसरजवळ झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला. संध्याकाळी मित्रांसोबत बाहेर पडलेल्या या तरुणांचा प्रवास अखेरचा ठरला. पाम टेंभी गावाच्या हद्दीत भरधाव दुचाकीने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत मोहित शर्मा, रवी गुप्ता आणि नयन महातो या तिघांचा जागीच मृत्यू झाला. एकाच वेळी तीन मित्रांचा मृत्यू झाल्याने बोईसरमधील गणेशनगर परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही तरुण बोईसरच्या गणेशनगर परिसरातील रहिवासी होते. ते दुचाकीवरून नांदगाव-आलेवाडी बीचच्या दिशेने जात होते. प्रवासादरम्यान पाम टेंभी गावाच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीची पुढे असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, मोहित शर्मा, रवी गुप्ता आणि नयन महातो यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या अपघातामुळे तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच परिसरातील तीन तरुण मित्रांचा अशा प्रकारे अंत झाल्याने गणेशनगरमधील नागरिकांमधून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. या अपघाताची नोंद सातपाटी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघात नेमका कशामुळे घडला, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.


