( सावंतवाडी / वार्ताहर )
मुंबई-गोवा महामार्गावरील मळगाव येथील जोशी-मांजरेकरवाडी सर्कलजवळ टाटा पंच कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. नामदेव उमेश आजगावकर (वय २०, रा. मळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेत दुचाकी चालवणारा त्याचा नातेवाईक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात काल (बुधवारी, २३ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव आजगावकर हा तरुण आपल्या नातेवाईकासोबत दुचाकीवरून मळगाव जोशी-मांजरेकरवाडी सर्कल परिसरात रस्ता ओलांडून जात होता. त्याचवेळी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टाटा पंच कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की दुचाकीच्या मागे बसलेला नामदेव काही अंतरावर फेकला गेला, तर दुचाकी चालवणारा त्याचा नातेवाईकही रस्त्याच्या कडेला जाऊन पडला.
अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या नामदेवला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, दुचाकी चालवणाऱ्या नातेवाईकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या प्रकरणाची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


