(संगमेश्वर /प्रतिनिधी)
तालुक्यातील पूर येथे गुरांची वाहतूक करणारी बोलेरो पिकअप उलटून झालेल्या अपघातात चालकासह दोन बैल जखमी झाले. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. ताम्हाणे येथून मलकापूरच्या दिशेने जाणाऱ्या या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या घटनेमुळे भरदिवसा गुरांची वाहतूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील तेजस सातपुते हा बोलेरो पिकअप (एमएच १० बीआर ४९६९) मधून बैल घेऊन ताम्हाणे येथून मलकापूरच्या दिशेने जात होता. पूर येथे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात तेजस सातपुते वाहनात अडकून पडला. मदतीसाठी त्याचा आक्रोश सुरू असतानाच या मार्गावरून प्रवास करणारे किरदाडी येथील रवी पेडणेकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. पेडणेकर यांनी तत्काळ देवरूख पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच तेजससोबत असलेल्या आणि अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका सहकाऱ्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, उपनिरीक्षक नामदेव जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित वेलवणकर आणि सचिन पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, रवी पेडणेकर, राकेश वेल्ये, झेपले, पूर येथील ग्रामस्थ तसेच ताम्हाणे येथील देवा भाटे यांच्यासह स्थानिक तरुणांनी बचावकार्यात पुढाकार घेतला. वाहनात अडकलेल्या तेजसला बाहेर काढल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने पलटी झालेली बोलेरो बाजूला करण्यात आली. या अपघातात तेजसच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. वाहनातील दोन बैलही जखमी झाले असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार केले. अपघातानंतर तेजससोबत असलेला आणखी एकजण भीतीपोटी घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, स्थानिकांच्या सतर्कतेमुळे त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत देवरूख पोलीस ठाण्यात सुरू होती.


