(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रेल्वे प्रवासासाठी आरक्षित जागा मिळवून देण्याच्या नावाखाली किंवा आरक्षणाच्या तिकिटांची बेकायदेशीर खरेदी-विक्री करून प्रवाशांची गरज आणि हतबलतेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांच्या अवैध व्यवसायप्रकरणी रत्नागिरीतील चंद्रकांत अशोक देशमुख (वय ४१, रा. खेडशी, रत्नागिरी) याला मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम भरण्यात कसूर केल्यास दहा दिवसांची साधी कैद भोगावी लागणार आहे.
रेल्वे सुरक्षा बल, रत्नागिरी यांनी या प्रकरणी कारवाई केली होती. दिनांक २२ जून २०२६ रोजी रेल्वे प्रवासासाठी आरक्षित जागा मिळवून देणे अथवा रेल्वे आरक्षणाच्या तिकिटांची खरेदी-विक्री करण्याचा बेकायदेशीर व्यवसाय केल्याचा आरोप देशमुख याच्यावर ठेवण्यात आला होता. भारतीय रेल्वे अधिनियमाच्या कलम १४३(१)(अ) अन्वये त्याच्याविरुद्ध संक्षिप्त फौजदारी खटला क्रमांक १७८/२०२६ दाखल करण्यात आला. न्यायालयात आरोपीला खटल्याच्या कागदपत्रांच्या प्रती मिळाल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावरील आरोप समजावून सांगण्यात आले. आरोपीने गुन्हा समजल्याचे सांगत तो स्वेच्छेने कबूल केला. यापूर्वी कोणताही गुन्हा केल्याचे त्याच्याविरुद्ध सिद्ध झालेले नाही, हा पहिलाच गुन्हा असल्याचे तसेच गुन्ह्याचे स्वरूप किरकोळ असल्याचे नमूद करीत त्याने कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.
आरोपीची गुन्ह्याची कबुली, त्याची विनंती आणि प्रकरणातील एकूण परिस्थिती विचारात घेऊन मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी त्याला दोषी ठरविले. भारतीय रेल्वे अधिनियमाच्या कलम १४३(१)(अ) अन्वये पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम न भरल्यास दहा दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा भोगावी लागणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. हा आदेश २४ नोव्हेंबर २०२६ रोजी पारित करण्यात आला.
आरक्षणाच्या नावाखालील गैरव्यवहाराला बळी पडू नका!
रेल्वेचे आरक्षण हे अधिकृत यंत्रणेद्वारे आणि नियमानुसारच करणे आवश्यक आहे. काही व्यक्ती तातडीच्या प्रवासाची गरज, गर्दी किंवा आरक्षण न मिळण्याची अडचण हेरून प्रवाशांना अवैध मार्गाने तिकिटे मिळवून देण्याचे आमिष दाखवतात. अशा व्यवहारांमध्ये आर्थिक फसवणुकीचा धोका तर असतोच; शिवाय बेकायदेशीर तिकीट व्यवहारांमुळे प्रवाशांनाही कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आरक्षणासाठी अधिकृत रेल्वे संकेतस्थळ, ॲप किंवा अधिकृत आरक्षण केंद्रांचाच वापर करावा. अनधिकृत व्यक्तींकडून तिकिटे खरेदी करण्याचे टाळावे आणि अशा प्रकारचा गैरव्यवहार निदर्शनास आल्यास रेल्वे सुरक्षा बलाकडे तक्रार करावी, हा या प्रकरणातून प्रवाशांनी घ्यावयाचा महत्त्वाचा धडा आहे.


