(देवळे / प्रकाश चाळके)
दिवाळीचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि गोडवा घेऊन यावा, या भावनेतून युवासेना संगमेश्वरच्या वतीने गोरगरीब आणि गरजू कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. आर्थिक परिस्थितीमुळे सणाच्या आनंदापासून वंचित राहणाऱ्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे आणि त्यांच्या दिवाळीत आनंदाचा गोडवा निर्माण करणे, हा या सामाजिक उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
फराळ वाटपादरम्यान युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध गरजू कुटुंबांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि जीवनातील संघर्ष जाणून घेतले. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करतानाही जगण्याची जिद्द आणि चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवणाऱ्या या कुटुंबांकडून उपस्थितांना जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची प्रेरणा मिळाली.
फराळाचे पाकीट स्वीकारताना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून पदाधिकारीही भारावून गेले. आपण या बांधवांना फराळ वाटण्यासाठी गेलो होतो; मात्र त्यांच्याकडून माणुसकी, समाधान आणि जीवन जगण्याची खरी जिद्द अनुभवण्याची संधी मिळाली, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
या सामाजिक उपक्रमासाठी पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, युवासेना नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री डॉ. उदयजी सामंत, आमदार किरणजी सामंत, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक, युवासेना कोकण सचिव विकास गोगावले आणि युवासेना स्कोर कमिटी सदस्य अपूर्वा सामंत यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी जिल्हाप्रमुख तुषार साळवी, युवासेना संपर्कप्रमुख लक्ष्मण कदम, तालुकाप्रमुख प्रसाद अभ्यंकर, तालुका संघटक शुभम गांधी, उपतालुकाप्रमुख पंकज देवळेकर, केतन दुधाणे, विभागप्रमुख अंकुश सुर्वे, शाखाप्रमुख सुमित वाघधरे, शाखाप्रमुख जितेंद्र जोयशी, शहरप्रमुख निरंजन शेंडगे, भाऊ थरवळ, दादू मोरे आणि समीर चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा छोटासा दिवा प्रज्वलित करता आला, तर त्यातून मिळणारे समाधान अनमोल असते. याच भावनेतून सामाजिक बांधिलकी जपत सेवा, समर्पण आणि माणुसकीचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प युवासेना संगमेश्वरच्या वतीने करण्यात आला. ‘फराळ वाटप केला खरा; पण आनंद वाटून आलो!’ या भावनेतून या उपक्रमाने दिवाळीच्या सणातील माणुसकीचा गोडवा अधिक वृद्धिंगत केला.


