रेल्वे प्रवाशांच्या जेवणाच्या दर्जाबाबत आणि स्वच्छतेबाबत सातत्याने व्यक्त होणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) खानपान व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यास सुरुवात केली आहे. लांब पल्ल्याच्या प्रीमियम गाड्यांमधील जेवणाचा मेन्यू मर्यादित करण्यात आला असून, यापुढे एका थाळीत ८ ते १० पदार्थ देण्याऐवजी केवळ चार मुख्य पदार्थ दिले जाणार आहेत. विमानातील केटरिंग व्यवस्थेच्या धर्तीवर हा बदल करण्यात आला आहे. १ नोव्हेंबरपासून देशातील तीन प्रमुख वंदे भारत स्लीपर गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
या प्रयोगासाठी मुंबई-बंगळुरू, नवी दिल्ली-वाराणसी आणि हावडा-कामाख्या या तीन वंदे भारत स्लीपर गाड्यांची निवड करण्यात आली आहे. या गाड्यांमधील प्रवाशांचा प्रतिसाद आणि नव्या व्यवस्थेचा अनुभव लक्षात घेऊन भविष्यात अन्य लांब पल्ल्याच्या प्रीमियम गाड्यांमध्येही हा नियम लागू करण्याचे नियोजन आहे.
नव्या मेन्यूनुसार नाश्त्यातील पदार्थांची संख्याही कमी करण्यात आली आहे. यापूर्वी दिले जाणारे सूप, ऑम्लेट, ऑम्लेट सँडविच, व्हेज सँडविच, ताक आणि चॉकलेट हे पदार्थ आता नाश्त्यातून वगळण्यात आले आहेत. त्याऐवजी चटणी आणि सांबारसोबत इडली-वडा, पोहे किंवा उपमा यांपैकी एकच पर्याय प्रवाशांना मिळणार आहे. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाच्या थाळीतून सुकी भाजी, दही, सलाड, लोणचे आणि मिठाईही हटवण्यात आली आहे. नव्या नियमानुसार चपाती, भात, डाळ आणि एक मुख्य भाजी असे चार पदार्थ दिले जातील. मुख्य भाजी शाकाहारी किंवा मांसाहारी पर्यायानुसार चिकनची असेल.
मेन्यूमधील पदार्थ कमी केल्याचा परिणाम जेवणाच्या एकूण वजनावरही झाला आहे. यापूर्वी एका वेळच्या जेवणाचे वजन ७०० ते ७५० ग्रॅम असायचे. आता ते कमी होऊन ४५० ते ५०० ग्रॅम झाले आहे. मात्र, पदार्थांची संख्या कमी केली असली तरी प्रत्येक पदार्थाचे स्वतंत्र प्रमाण पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आल्याचे आयआरसीटीसीने स्पष्ट केले आहे. अतिरिक्त पदार्थ वगळल्यामुळेच जेवणाचे एकूण वजन कमी झाल्याचे महामंडळाने सांगितले.
दरम्यान, रेल्वेतील खानपान सेवेचा दर्जा आणि स्वच्छता सुधारण्यासाठी जेवण तयार करण्याची जबाबदारी देण्याच्या पद्धतीतही बदल करण्यात आले आहेत. जुन्या कंत्राटदारांऐवजी ‘ताजसॅट्स’, ‘सरोवर पोर्टिको’ आणि ‘मेफेअर ग्रुप’ यांसारख्या मोठ्या क्लाऊड किचन कंपन्यांकडे जेवण तयार करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. या बदलांमुळे गेल्या काही दिवसांत रेल्वेतील खाद्यपदार्थांबाबतच्या प्रवाशांच्या तक्रारींमध्ये १० टक्क्यांनी घट झाल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला आहे.


