अवकाश संशोधनात खगोलशास्त्रज्ञांच्या हाती एक अत्यंत दुर्मिळ खगोलीय रचना लागली आहे. आपल्या सूर्यमालेपासून अवघ्या २८ प्रकाशवर्षे अंतरावर ‘वेलपोआई’ (Welopō’ai) नावाची त्रै-तारा प्रणाली शोधण्यात आली आहे. या अनोख्या प्रणालीमध्ये एक लाल बटू तारा आणि दोन श्वेत बटू ताऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या प्रणालीपासून १०० प्रकाशवर्षांच्या परिघात अशा प्रकारची दुसरी कोणतीही प्रणाली अस्तित्वात नाही.
या शोधाचे वैशिष्ट्य म्हणजे, संशोधक मूळतः एका लाल बटू ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांचा शोध घेत असताना त्यांना या अनोख्या तारा प्रणालीचा उलगडा झाला. मॉन्ट्रियल विद्यापीठाच्या ‘ट्रॉटियर इन्स्टिट्यूट’मधील एतिएन आतिगाऊ (Étienne Artigau) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हवाईमधील मौना केआ (Mauna Kea) येथील दुर्बिणीच्या साहाय्याने निरीक्षणे केली होती. या प्रक्रियेत ताऱ्याच्या प्रकाशातील बदल आणि त्याच्यावर कार्य करणाऱ्या गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण झालेला सुमारे १६ किलोमीटर प्रति सेकंद वेग संशोधकांच्या लक्षात आला. त्यावरून आढळलेली वस्तू ग्रह नसून श्वेत बटू तारा असल्याचे स्पष्ट झाले. श्वेत बटू हा अत्यंत घनता असलेला, मात्र कमी प्रकाशमान असलेला मृत ताऱ्याचा अवशेष असतो. या संशोधनाचा अहवाल ‘ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स’ (Astronomy & Astrophysics) या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे.
या प्रणालीची निर्मिती आणि सध्याची रचना शास्त्रज्ञांसाठी विशेष कुतूहलाचा विषय ठरली आहे. सुरुवातीला या प्रणालीमध्ये सूर्यासारखे दोन मोठे तारे आणि एक लहान लाल बटू तारा होते. कालांतराने दोन्ही मोठ्या ताऱ्यांचे इंधन संपले आणि त्यांचे रूपांतर श्वेत बटू ताऱ्यांमध्ये झाले. मात्र, लाल बटू तारा अद्याप सक्रिय अवस्थेत आहे.
सूर्यासारख्या ताऱ्याचे इंधन संपल्यानंतर त्याचा आकार प्रचंड वाढतो. या अवस्थेला ‘रेड जायंट’ अर्थात रक्त महाकाय तारा असे म्हणतात. त्यानंतर ताऱ्याचे बाहेरील थर अवकाशात विखुरले जातात आणि त्याचा पृथ्वीच्या आकाराचा, मात्र अत्यंत घन असलेला गाभा शिल्लक राहतो. या अवशेषाला श्वेत बटू तारा म्हटले जाते.
या त्रै-तारा प्रणालीतील सर्वाधिक आश्चर्यकारक बाब म्हणजे दोन ताऱ्यांमधील अंतर आणि त्यांची स्थिर कक्षा. मॉन्ट्रियलमधील शास्त्रज्ञ पॅट्रिक ड्युफोर (Patrick Dufour) यांच्या मते, ही प्रणाली सध्याच्या स्वरूपात अस्तित्वात असणे जवळजवळ अशक्य मानले जाते. नव्याने शोधलेला श्वेत बटू तारा आपल्या लाल बटू जोडीदाराभोवती अत्यंत जवळच्या कक्षेत फिरत आहे. या दोघांमधील अंतर गुरू ग्रह आणि सूर्य यांच्यातील सुमारे ६८८ दशलक्ष किलोमीटर अंतरापेक्षाही कमी आहे.
मात्र, श्वेत बटू तारा होण्यापूर्वी हा तारा ‘रेड जायंट’ अवस्थेत असताना त्याचा आकार मोठ्या प्रमाणात विस्तारला होता. अशा परिस्थितीत त्याने जवळच्या लाल बटू ताऱ्याची कक्षा विस्कळीत करणे किंवा त्याला पूर्णपणे स्वतःमध्ये सामावून घेणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र लाल बटू तारा आजही आपल्या कक्षेत सुरक्षित आणि स्थिर आहे. हे नेमके कसे घडले, याबाबत शास्त्रज्ञांकडे अद्याप ठोस स्पष्टीकरण उपलब्ध नाही.
पृथ्वीपासून तुलनेने कमी अंतरावर असलेली ही प्रणाली भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाची संधी उपलब्ध करून देत आहे. तिच्यातील ताऱ्यांचे वस्तुमान आणि परस्परांमधील गुरुत्वाकर्षण बल अचूकपणे मोजणे संशोधकांना शक्य होत आहे. निरीक्षणांनुसार, लाल बटू ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या ४२ टक्के, तर त्याच्या जवळच्या श्वेत बटू ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या ६२ टक्के आहे. याशिवाय, तिसरा श्वेत बटू तारा या दोघांच्या जोडीभोवती प्रदक्षिणा घालत असून, त्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे १,००० वर्षे लागतात.


