(रत्नागिरी चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथे अवघ्या तीन दिवसांच्या नवजात बालिकेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहाटे आईने दूध पाजून बालिकेला झोपवले होते. मात्र, दोन तासांनंतर पाहिले असता तिच्या शरीराची कोणतीही हालचाल दिसून आली नाही. कुटुंबीयांनी तातडीने तिला चिपळूण येथील खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर बालिकेला मृत घोषित केले. याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ६८/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. मृत बालिका अवघ्या तीन दिवसांची होती.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास बालिकेची आई निदा अब्बास दळवी हिने आपल्या तीन दिवसांच्या बाळाला दूध पाजून झोपवले होते. त्यानंतर पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास तिने बालिकेकडे पाहिले असता तिची कोणतीही हालचाल दिसून आली नाही. हा प्रकार लक्षात येताच निदा दळवी यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी बालिकेला तातडीने चिपळूण येथील डॉ. खेडकर यांच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून उपचार केले; मात्र बालिकेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तिला मृत घोषित करण्यात आले.
अवघ्या तीन दिवसांच्या चिमुकलीचा असा अकाली अंत झाल्याने दळवी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद चिपळूण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.


