(रत्नागिरी /प्रतिनिधी)
घरासमोरील तुळशी विवाहाचा धार्मिक सोहळा सुरू असतानाच सामाईक जमिनीच्या जुन्या वादाने उग्र रूप धारण केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील आरवली गुरववाडी येथे घडली. दोन नातेवाईक गट आमनेसामने आल्याने वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. लोखंडी पाइपने मारहाण, थपडा-बुक्क्यांचा मार आणि शिवीगाळ झाल्याच्या परस्परविरोधी तक्रारी संगमेश्वर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी पहिल्या गुन्ह्यात १४, तर दुसऱ्या गुन्ह्यात २९ अशा एकूण ४३ जणांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांतील व्यक्ती एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यात सामाईक जमीन-जागेवरून दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. हा वाद न्यायप्रविष्ट असतानाच २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आरवली गुरववाडी येथे धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही गटांत पुन्हा संघर्ष उफाळला. पहिल्या घटनेत सागर अनंत गुरव (वय ३१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते घरासमोरील तुळशी वृंदावनात तुळशी विवाहाची तयारी करीत होते. त्यावेळी विरोधी गटातील १४ जणांनी कथितरीत्या बेकायदेशीर जमाव करून कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. फिर्यादी आणि उपस्थित साक्षीदारांशी बाचाबाची सुरू झाली. तुळशी विवाहाचा कार्यक्रम पार पडू द्या, त्यानंतर आपण चर्चा करू, अशी विनंती करण्यात आली. मात्र, वाद अधिकच चिघळल्याचा आरोप आहे.
यावेळी एका संशयित आरोपीने भावकीतील महिलांबाबत आक्षेपार्ह शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आरोपी क्रमांक २ व ४ यांनी लोखंडी पाइपने फिर्यादीच्या पाठीवर मारहाण केली. तसेच संतोष गणपत गुरव आणि रोशन गजानन गुरव यांच्या गालावर थपडा मारण्यात आल्या, तर संदिप तुकाराम गुरव यांच्या नाकावर मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अन्य आरोपींनीही फिर्यादी आणि साक्षीदारांना धक्काबुक्की करून मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत प्रकाश तुकाराम गुरव (वय ३८), संदिप तुकाराम गुरव (वय ३७) आणि रोशन गजानन गुरव (वय २८) हे जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी अनिकेत सुभाष गुरव याच्यासह १४ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९०, १९१(२), ११५(२), ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता या गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, याच घटनेच्या अनुषंगाने दुसऱ्या गटाकडूनही स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुभाष जयसिंग गुरव (वय ५३, व्यवसाय शेती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मूळ घराच्या ठिकाणी पूजा आणि धार्मिक कार्यक्रमासाठी कुटुंबीय एकत्र जमले होते. तुळशी विवाहाचा कार्यक्रम सुरू असताना विरोधी गटातील व्यक्तींनी कथितरीत्या बेकायदेशीर जमाव करून तेथे प्रवेश केला. त्यानंतर शिवीगाळ आणि वादावादीला सुरुवात झाली.
तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक १ व २ यांनी स्वप्नील जयसिंग गुरव यांच्या डोक्यात लोखंडी पाइपने मारहाण केली. अन्य आरोपींनी फिर्यादी, त्यांच्या मुलासह कुटुंबातील सदस्यांना थपडा-बुक्क्यांनी मारहाण करून धक्काबुक्की केली. तसेच उपस्थितांना शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत स्वप्नील जयसिंग गुरव (वय ४०) आणि शैलेश जयसिंग गुरव (वय ३८) हे जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी सागर अनंत गुरव याच्यासह एकूण २९ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९०, १९१(२), ११८(१), ११५(२), ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ नोव्हेंबर रोजी पहाटे २.१४ वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
जमिनीचा वाद पुन्हा ऐरणीवर
एकाच कुटुंबातील नातेवाईकांमध्ये सामाईक मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या संघर्षात झाल्याने आरवली गुरववाडी परिसरात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात मारहाण आणि बेकायदेशीर जमाव जमविल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे नेमकी घटना कशी घडली, मारहाणीत कोणाचा सहभाग होता आणि दोन्ही तक्रारींमधील आरोपांची वस्तुस्थिती काय, हे पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.


