(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील फौजदारवाडी-धवडे येथील ४२ वर्षीय व्यक्तीचा मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सचिन अर्जुन जाधव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी रागाच्या भरात दारूच्या नशेत राहत्या घरी विषारी तणनाशक औषध प्राशन केले होते. त्यानंतर जवळपास तीन दिवस विविध रुग्णालयांत उपचार घेतल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास सचिन जाधव यांनी दारूच्या नशेत ‘एम. क्वाईट’ हे विषारी तणनाशक औषध प्राशन केले. त्यानंतर ते बेशुद्ध पडल्याने त्यांना तातडीने खेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृतीच्या कारणास्तव तेथून त्यांना त्याच दिवशी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
रत्नागिरी येथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर पुढील उपचारांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी त्यांना मुंबईतील परळ येथील के.ई.एम. रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २० मध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच १ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.५५ वाजता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मृताची पत्नी सुरेखा सचिन जाधव यांनी दिल्यानंतर खेड पोलिस ठाण्यात २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.२३ वाजता आकस्मिक मृत्यू क्रमांक ९६/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.


