( रत्नागिरी /प्रतिनिधी )
वैद्यकीय पेशातील पवित्र तत्त्वांना तिलांजली देत पैशांच्या हव्यासापोटी थेट कळी खुडण्याचे क्रूर कृत्य करणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील खासगी डॉक्टरचा काळा धंदा अखेर चव्हाट्यावर आला आहे. बेकायदेशीररीत्या १६ ते १८ आठवड्यांच्या स्त्रीभ्रूणाची हत्या केल्याप्रकरणी देवरुख पोलिसांनी डॉ. विजय नारकर याच्यासह करवीर तालुक्यातील संबंधित दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉक्टर आणि पतीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, न्यायालयाने दोघांनाही २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे कोल्हापूरपर्यंत जुळलेले असल्याने, या संपूर्ण ‘स्त्रीभ्रूणहत्या रॅकेट’चा पोलीस पर्दाफाश करणार का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील एक दांपत्य १९ नोव्हेंबर रोजी गर्भपातासाठी संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील डॉ. विजय नारकर याच्याकडे आले होते. नारकर याने अत्यंत बेकायदेशीररीत्या १६ ते १८ आठवड्यांच्या स्त्रीभ्रूणाचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या क्रूर प्रक्रियेदरम्यान महिलेला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने डॉक्टर आणि दांपत्याची घाबरगुंडी उडाली. प्रकृती हाताबाहेर जात असल्याचे पाहून त्यांनी तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. तेथील विशेष स्त्रीरोग तज्ज्ञांनी केलेल्या सखोल तपासणीत हा प्रकार स्त्रीभ्रूणहत्येचा असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा शल्यचिकित्सकांनी याबाबतचा अहवाल दिल्यानंतर देवरुख पोलिसांनी तातडीने कारवाई करत डॉक्टरसह पती-पत्नीवर भारतीय न्याय संहिता आणि ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
लांजा उपविभागाचे उपअधीक्षक सुरेश कदम यांनी देवरुख पोलीस ठाण्यात भेट देऊन तपासाची चक्रे वेगवान केली आहेत. डॉ. नारकर याच्यावर यापूर्वी २०२४ मध्येही करवीर येथे स्त्रीभ्रूणहत्येचा गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. कायद्याचा कोणताही धाक न बाळगता या डॉक्टरने साखरप्यात आपला हा काळाबाजार पुन्हा सुरू केल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, या निमित्ताने अनेक गंभीर प्रश्न समोर आले आहेत. गर्भपातापूर्वी महिलेला दिल्या जाणाऱ्या प्रतिबंधित गोळ्या नेमक्या कोठून आणल्या गेल्या, यात कोणत्या औषध विक्रेत्यांचा सहभाग आहे का? डॉ. नारकर हा किती वर्षांपासून हा बेकायदेशीर उद्योग चालवत होता आणि कोल्हापूर-रत्नागिरी जिल्ह्यांत पसरलेल्या या साखळीत आणखी कोणते ‘पांढरपेशे’ गुन्हेगार सामील आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून पोलीस या संपूर्ण रॅकेटच्या मुळावर घाव घालणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह!
बेकायदेशीर गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित गोळ्या (एमटीपी किट) नेमक्या कोठून उपलब्ध झाल्या, हा या तपासातील सर्वात कळीचा मुद्दा ठरला आहे. कायद्यानुसार, केवळ नोंदणीकृत तज्ज्ञ डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच या गोळ्यांची विक्री करणे बंधनकारक आहे. असे असतानाही, एका खासगी डॉक्टरकडे या गोळ्यांचा साठा सहजपणे पोहोचलाच कसा, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील औषध दुकानांवर देखरेख ठेवणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कार्यक्षमतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा काळाबाजार सुरू होता का, आणि या गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या बेकायदेशीर साखळीवर ‘एफडीए’ कारवाई करणार का, याकडेही आता लक्ष लागले आहे.
२०२४ च्या रॅकेटमधील ‘नवव्या आरोपी’ची पुन्हा तीच मजल
कायद्याच्या कचाट्यात एकदा अडकल्यानंतरही गुन्हेगारी वृत्ती कशी बळावते, याचे धक्कादायक उदाहरण साखरपा प्रकरणातून समोर आले आहे. मार्च २०२४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बहुचर्चित अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटमध्ये डॉ. विजय नारकर हा ‘नववा आरोपी’ होता. त्यावेळी करवीर पोलिसांनी रत्नागिरीत येऊन त्याला बेड्या ठोकल्या होत्या आणि त्याच्या दवाखान्यातून गर्भपाताच्या प्रतिबंधित औषधांचा मोठा साठाही जप्त केला होता. इतकी मोठी कारवाई होऊनही आणि जामिनावर बाहेर आल्यानंतरही, या डॉक्टरने कोणतीही भीती न बाळगता साखरप्यात पुन्हा तोच काळा धंदा सुरू केला. ‘एकदा अटक होऊनही पुन्हा तोच गंभीर गुन्हा करण्याची इतकी हिंमत या डॉक्टरकडे आली कोठून?’ आणि जामिनावर सुटल्यानंतर त्याच्या हालचालींवर आरोग्य विभाग व पोलिसांचे लक्ष नव्हते का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.


