(रत्नागिरी /प्रतिनिधी)
चंपक मैदान येथे सुरू असलेल्या फन फेअर मेळ्यातून बाहेर पडताना दुचाकीस्वाराच्या बेदरकारपणाचा फटका एका ११ वर्षीय चिमुरडीला बसला. मेळ्याच्या पार्किंगमधून मित्राला पाठीमागे बसवून भरधाव वेगात दुचाकी चालवत बाहेर पडलेल्या चालकाने कच्च्या रस्त्यावरून पायी जाणाऱ्या मुलीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात मैत्रेयी निलेश आंबेरकर (वय ११, रा. गाडीतळ, रत्नागिरी) ही मुलगी जखमी झाली. याप्रकरणी दुचाकीचालक मोहम्मद कैफ इकबाल मुल्ला (वय २३, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) याच्याविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चंपक मैदान येथील फन फेअर मेळ्यात हा प्रकार घडला. आरोपी मोहम्मद कैफ मुल्ला हा त्याच्या ताब्यातील टीव्हीएस एन्टॉर्क दुचाकी (क्रमांक एमएच ०८ बीएम ३१०३) पार्किंगमधून बाहेर काढून मित्राला पाठीमागे बसवून मेळ्यातून बाहेर पडत होता. यावेळी बाहेर जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याने दुचाकी अविचाराने, हयगयीने आणि निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवली. त्याचवेळी कच्च्या रस्त्यावरून पायी पुढे चालत असलेल्या मैत्रेयी आंबेरकर हिला दुचाकीने मागून धडक दिली. या धडकेत ती जखमी झाली. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या मेळ्यातून बाहेर पडताना वेगावर नियंत्रण न ठेवल्याने हा अपघात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण कल्लापा पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहम्मद कैफ इकबाल मुल्ला याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेळ्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहेत.


