(रत्नागिरी / वार्ताहर)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकवेळ समझोता (OTS) योजनेचा लाभ घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ५९१ शेतकरी आधार प्रमाणीकरणासाठी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी आणि योजनेची प्रमाणित कार्यपद्धती २० नोव्हेंबर २०२६ रोजी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी विहित मुदतीत स्वतःच्या हिश्श्याची रक्कम भरून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) राम कुलकर्णी यांनी केले आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेली पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, तसेच सर्व राष्ट्रीयीकृत आणि ग्रामीण बँकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, बँकेचा तपशील, विशिष्ट क्रमांक, ३१ मार्च २०२६ रोजीची थकीत कर्जाची रक्कम (स्तंभ ९), हेअरकट अर्थात सवलत वजा केल्यानंतरची थकीत रक्कम (स्तंभ १०), शेतकऱ्याने भरावयाचा हिस्सा (स्तंभ ११) आणि पात्र शासकीय लाभाची रक्कम (स्तंभ १२) अशी माहिती देण्यात आली आहे.
एकवेळ समझोता (OTS) योजनेची मुदत ३१ मार्च २०२७ पर्यंत असून, या योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतःच्या हिश्श्याची रक्कम त्याच तारखेपर्यंत भरणे बंधनकारक आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणीचा (फार्मर आयडी) क्रमांक असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही, त्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त जाऊन तातडीने नोंदणी पूर्ण करून घ्यावी.
शेतकऱ्याचे एकच कर्ज खाते असल्यास यादीतील स्तंभ ११ मध्ये नमूद केलेली स्वतःच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँक शाखेत जमा करावी लागेल. उदाहरणार्थ, पात्र थकीत कर्जाची रक्कम २.६० लाख रुपये असल्यास शेतकऱ्याला प्रथम स्वतःचा हिस्सा म्हणून ६० हजार रुपये भरावे लागतील. त्यानंतर नियमानुसार पात्र OTS रकमेबाबत पुढील कार्यवाही केली जाईल.
एकापेक्षा अधिक कर्ज खाती असलेल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या हिश्श्याची रक्कम कोणत्याही एका कर्ज खात्यात जमा करता येईल. मात्र, एका खात्यात भरली जाणारी रक्कम स्तंभ १० मध्ये नमूद केलेल्या रकमेपेक्षा अधिक असता कामा नये. यासंदर्भात संबंधित बँकांकडून शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे.
शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेची माहिती संबंधित बँकांनी दर शुक्रवारी महाआयटी (MahaIT) पोर्टलवर अद्ययावत करून त्याबाबत शेतकऱ्यांना कळवणे आवश्यक आहे. पोर्टलवर रक्कम जमा झाल्याची नोंद झाल्यानंतर तीन दिवसांनी आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध होईल. त्यानंतर शेतकऱ्यांनी नियुक्त ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.
आधार प्रमाणीकरण, तक्रार नोंदणी आणि तक्रार निवारणाची प्रक्रिया यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेप्रमाणेच राहणार आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पात्र शासकीय लाभाची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात जमा केली जाईल. शासनाचा हिस्सा प्राप्त झाल्यानंतर बँकेकडून संबंधित कर्ज खात्याची लेजर (खातेपुस्तिका) नोंद अद्ययावत करण्यात येईल. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी योजनेची मुदत लक्षात घेऊन आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.


