(रत्नागिरी /प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील आंबडस खोतवाडी येथे बंद घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक आणि कोयंडा हत्याराने कापून घरात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्याने बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरवर डल्ला मारला. लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. १३ ते २० नोव्हेंबरदरम्यान हा चोरीचा प्रकार घडला असून, याप्रकरणी अशोक रघुनाथ जाधव (वय ५८, रा. आंबडस खोतवाडी, ता. खेड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजल्यापासून २० नोव्हेंबर रोजी दुपारी १२.४५ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने जाधव यांच्या घराला लक्ष्य केले. घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक आणि कोयंडा कोणत्यातरी हत्याराने कापून चोरट्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटातील लॉकर उघडून त्यामधील मौल्यवान ऐवज चोरून नेला.
चोरीस गेलेल्या ऐवजात १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार, १२ ग्रॅम वजनाचा डिझाइनदार नेकलेस, ११ ग्रॅम वजनाची सोन्याची पिळ्याची चैन, ४ ग्रॅम वजनाची कर्णफुलांची जोडी, ४ ग्रॅम वजनाची कानपट्टी वेल, ४ ग्रॅम वजनाच्या नक्षीदार गोल रिंगची जोडी, २.०५ ग्रॅम वजनाचे बदामपान, ७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे वाघनख यांचा समावेश आहे. याशिवाय चांदीचा कमरेचा छल्ला, चांदीची अंगठी आणि २० हजार रुपयांची रोख रक्कमही चोरट्याने लंपास केली. चोरीस गेलेल्या सर्व ऐवजाची एकूण किंमत ६ लाख ४० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, चोरीस गेलेले बहुतांश दागिने सुमारे दहा वर्षांपूर्वी खरेदी केलेले होते. घरातील मौल्यवान वस्तू ठेवलेल्या लॉकरलाच चोरट्याने लक्ष्य केल्याने या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १.२५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये तसेच तक्रारीतील नमूद तरतुदींनुसार पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. चोरट्याने घरात प्रवेश करण्यासाठी वापरलेले हत्यार, घटनास्थळावरील पुरावे आणि चोरीस गेलेला ऐवज यांचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान ठरणार आहे.


