(रत्नागिरी / प्रतिनिधी)
अंगणात रस्ता बांधण्याच्या कामावरून झालेल्या वादाचे पर्यवसन थेट मारहाणीत झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील टेरव तांदळेवाडी येथे घडली. रस्त्याचे काम सुरू असताना ये-जा करण्याच्या मार्गावरून आक्षेप घेत एका व्यक्तीने फावड्याने तिघांना मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे. या घटनेत शिवाजी नारायण म्हालीम (वय ४५), राजेंद्र म्हालीम आणि काशीराम म्हालीम हे तिघे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास टेरव तांदळेवाडी येथे फिर्यादी शिवाजी म्हालीम आणि साक्षीदार रस्त्याचे काम करीत होते. त्याचवेळी आरोपी संजय सिमाराम म्हालीम (वय ४७, रा. टेरव तांदळेवाडी, ता. चिपळूण) तेथे आला. ‘तुम्ही अंगणात रस्ता का बांधत आहात? हा आमच्या येण्या-जाण्याचा मार्ग आहे,’ असे म्हणत त्यांनी कामाबाबत आक्षेप घेतला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये वादावादी सुरू झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतप्त झालेल्या आरोपीने घटनास्थळी असलेले फावडे उचलून फिर्यादी आणि साक्षीदारांना हातावर, पायावर तसेच दंडावर मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात तिघांना दुखापत झाली.
जखमी शिवाजी म्हालीम यांना उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या वैद्यकीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांचा जबाब नोंदविला. त्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात संजय म्हालीम याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगणातील रस्त्याच्या कामावरून सुरू झालेला वाद फावड्याने केलेल्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने टेरव परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.


