(रत्नागिरी / वार्ताहर)
सह्याद्रीच्या आव्हानात्मक घाटवाटांवर पार पडलेल्या सह्याद्री क्लासिक सायकलिंग स्पर्धेत रत्नागिरीच्या शमिका संतोष खानविलकर हिने महिला ओपन गटात विजेतेपद पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली. सलग दोन सिझन रत्नागिरी रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या शमिकाने यंदा सह्याद्री क्लासिकसारख्या कठीण स्पर्धेतही आपले वर्चस्व सिद्ध केले.
महिला ओपन गटातील १ घाट (तापोळा) प्रकारात शमिकाने २४ किलोमीटरचे अंतर आणि ७५२ मीटर उंचीचा चढ यशस्वीपणे पूर्ण करत विजेतेपदाला गवसणी घातली. तिच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
दरम्यान, सह्याद्री क्लासिक स्पर्धेचे सलग दोन वेळा विजेतेपद मिळवणारे विनायक पावसकर यंदा हॅटट्रिक साधण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले होते. मात्र, पहिल्या घाटापासूनच त्यांना स्नायूंमध्ये क्रॅम्पचा त्रास जाणवू लागला. दुसऱ्या घाटातही शेवटपर्यंत हा त्रास कायम राहिल्याने त्यांना यंदा पोडियमवर स्थान मिळवता आले नाही. असे असतानाही त्यांनी हार न मानता जिद्दीने स्पर्धा पूर्ण केली आणि टॉप १० मध्ये स्थान मिळवले.
पावसकर यांना या आव्हानात्मक प्रवासात प्रसाद आलेकर आणि विक्रांत आलेकर यांची मोलाची मदत मिळाली. त्यांनी वेळोवेळी फिजिओथेरपी उपचार देऊन पावसकर यांना दिलासा दिला. त्यामुळे त्यांना दुसरा केळघर घाट पूर्ण करणे शक्य झाले. या कठीण प्रसंगी मिळालेल्या सहकार्याबद्दल पावसकर यांनी दोघांचेही विशेष आभार मानले.
पावसकर यांनी पहिला तापोळा घाट १५ किलोमीटर अंतराचा आणि ६३१ मीटर चढाचा टप्पा १ तास ४ मिनिटांत पूर्ण केला. त्यानंतर दुसरा केळघर घाट २४ किलोमीटर अंतराचा आणि ७५२ मीटर चढाचा टप्पा १ तास २९ मिनिटांत पार केला. अशा प्रकारे त्यांनी दोन्ही घाट मिळून एकूण ३९ किलोमीटर अंतर आणि १३८३ मीटर उंचीचा चढ पूर्ण केला.
या संपूर्ण स्पर्धेदरम्यान रत्नागिरी सायकलिस्ट क्लब (RCC), क्लबचे सदस्य आणि कुटुंबीयांकडून पावसकर यांना सातत्याने प्रोत्साहन मिळाले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीतही शेवटपर्यंत लढण्याचे बळ मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शमिका खानविलकरचे विजेतेपद, स्नायूंच्या त्रासावर मात करत स्पर्धा पूर्ण करणारे विनायक पावसकर यांची जिद्द आणि प्रसाद आलेकर, विक्रांत आलेकर यांच्यासह रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व कुटुंबीयांचे सहकार्य यामुळे यंदाची सह्याद्री क्लासिक सायकलिंग स्पर्धा रत्नागिरीच्या सायकलिंग क्षेत्रासाठी विशेष ठरली.


