(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज (सोमवारी) महत्त्वाची निवड प्रक्रिया पार पडत आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे स्पष्ट वर्चस्व असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या निवड प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत असून प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ३४ व्या अध्यक्षपदी अस्मिता अनंत केंद्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक अनुभव लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. १९८७ पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या केंद्रे यांनी मंडणगड तालुका समन्वय समिती, कोकण म्हाडा सदस्यत्व तसेच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व वित्त समितीत महत्त्वपूर्ण काम केले आहे. २०२६ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्या भिंगळोली मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. त्यांच्या अनुभवाचा लाभ जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी विलास चाळके यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांची निवडही जवळपास निश्चित मानली जात आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर ‘जयेश मंगल पार्क’ येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. बैठकीनंतर सर्व पदाधिकारी एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
जिल्हा परिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता असल्याने कोणताही विरोध होण्याची शक्यता नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही निवड प्रक्रिया केवळ औपचारिकता ठरणार असून या निमित्ताने शिवसेनेकडून जिल्ह्यात शक्तिप्रदर्शनाची तयारीही सुरू आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात येणार आहे.

