(देवळे /!प्रकाश चाळके)
रत्नागिरी-कोल्हापूर-नागपूर महामार्गाच्या कामादरम्यान संगमेश्वर तालुक्यातील करंजारी मराठी शाळेसमोर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या मार्गावरच गटारासाठी मोठा खड्डा ठेवण्यात आल्याने अंगणवाडी तसेच इयत्ता पहिली ते चौथीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीविताचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये संबंधित ठेकेदार कंपनीच्या कामकाजाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम रवी इन्फ्रा कंपनीकडून सुरू आहे. महामार्गाच्या कामादरम्यान स्थानिक नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या आहेत. या समस्या दूर करण्याचे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नागरिकांच्या अडचणी कायम असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
करंजारी मराठी शाळेसमोर शाळेच्या गेटकडे जाणाऱ्या मार्गावर गटाराचा मोठा खड्डा ठेवण्यात आला आहे. हा मार्ग विद्यार्थ्यांच्या नियमित ये-जा करण्याचा असल्याने एखादा विद्यार्थी या खड्ड्यात पडून गंभीर जखमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा खड्डा तातडीने बुजवावा किंवा त्यावर सुरक्षित झाकण बसवावे, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे.
याबाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित बाब असूनही दुर्लक्ष केले जात असल्याने पालकांमध्ये नाराजी वाढली आहे.
शाळेच्या प्रवेशद्वारासमोरच अशा प्रकारे धोकादायक खड्डा ठेवणे गंभीर बाब आहे. या ठिकाणी कोणताही अपघात अथवा जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर राहील, असा इशारा संतप्त पालकांनी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून संबंधित यंत्रणेने तातडीने पाहणी करून खड्डा सुरक्षित करावा, अशी मागणी होत आहे.

