(ठाणे / वृत्तसंस्था)
गेल्या सात ते आठ वर्षांपासून सुरू असलेले कथित प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय तरुणीने घेतल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने थेट तिचे घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पूर्वेतील मानपाडा परिसरात घडली आहे. १९ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या प्रकारात तरुणीसह तिचे आई-वडील आगीच्या संकटातून थोडक्यात बचावले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी दीपेश रस्तोगी याला २० नोव्हेंबर रोजी अटक केली असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका उच्चभ्रू वस्तीत पीडित तरुणी आपल्या कुटुंबासह राहते. तिचे आरोपी दीपेश रस्तोगी याच्यासोबत गेल्या सात ते आठ वर्षांपासून कथित प्रेमसंबंध होते. मात्र, कालांतराने दोघांमध्ये मतभेद निर्माण होऊन वारंवार वाद होऊ लागले. या परिस्थितीत संबंध पुढे सुरू ठेवायचे नाहीत, असा निर्णय तरुणीने घेतला होता. तिने आपला निर्णय दीपेशला स्पष्टपणे कळवला होता. मात्र, संबंध संपवण्याचा निर्णय त्याला मान्य नसल्याने त्याच्या मनात संताप निर्माण झाला होता.
याच संतापातून दीपेशने १९ नोव्हेंबर रोजी तरुणीच्या घराला आग लावल्याचा आरोप आहे. अचानक घरात आग लागल्याने कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली. या आगीत तरुणीसह तिचे आई-वडील अडकण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, तिघांनीही या संकटातून सुखरूप बचाव केल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक आणि मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानपाडा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान दीपेश रस्तोगी याचा या प्रकरणातील सहभाग समोर आल्यानंतर पोलिसांनी २० नोव्हेंबर रोजी त्याला अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, घराला आग लावण्यामागे प्रेमसंबंध संपल्याचा राग हेच कारण होते की अन्य काही कारणेही होती, याचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेत तरुणीसह तिचे आई-वडील थोडक्यात बचावले आहेत. मात्र आरोपीने संपूर्ण कुटुंबालाच संपवण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन शिंदे यांनी या प्रकरणाचा मानपाडा पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती दिली.


