(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील कुडवली येथील प्रगतिशील शेतकरी संदीप वेल्हाळ यांनी आपल्या शेतीतील प्रयोगशीलतेच्या जोरावर विक्रमी कोहळ्याचे उत्पादन घेतले आहे. सप्तलिंगी नदीच्या काठावरील त्यांच्या शेतात पिकलेल्या या कोहळ्याचे वजन तब्बल ९ किलो २१४ ग्रॅम भरले असून, त्याने परिसरातील नागरिक आणि शेतीप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. या कोहळ्याला २५० रुपयांचा भाव मिळाला आहे.
देवरूखमधील क्रांती व्यापारी संघटनेचे सहसचिव आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले संदीप वेल्हाळ शेतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात. पारंपरिक शेतीला प्रयोगशीलतेची जोड देत उत्पादनाची गुणवत्ता आणि क्षमता वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. याच प्रयत्नांतून सप्तलिंगी नदीच्या सुपीक काठावरील त्यांच्या शेतात हा वजनदार कोहळा फुलला आहे. आकार आणि वजनामुळे हा कोहळा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
या विक्रमी कोहळ्याचा अनावरण सोहळा क्रांती व्यापारी संघटनेचे सचिव आणि संदीप वेल्हाळ यांचे सहकारी नंदकिशोर उर्फ अण्णा बेर्डे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी देवरूख क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर उपस्थित होते.
कोकणातील शेतीमध्ये योग्य नियोजन, मेहनत आणि प्रयोगशील वृत्तीच्या माध्यमातून उल्लेखनीय उत्पादन घेता येऊ शकते, हे संदीप वेल्हाळ यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता नवनवीन प्रयोग करण्याची त्यांची जिद्द निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रांती व्यापारी संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, आगामी शेती प्रयोगांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


