( मुंबई / वृत्तसंस्था )
राज्यातील अंगणवाडी केंद्रांचे आधुनिकीकरण करून बालकांना सुरक्षित, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील ३,८३२ अंगणवाडी केंद्रांचे ‘स्मार्ट अंगणवाडी’मध्ये रूपांतर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.
अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या सुविधा पुरवल्या जातात. तसेच गर्भवती महिला आणि स्तनदा मातांनाही पोषण व आरोग्यविषयक सेवा दिल्या जातात. या केंद्रांमधील सुविधा अधिक सक्षम करून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राबविण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी शासकीय जागेत असलेल्या आणि विद्युत जोडणीची सुविधा उपलब्ध असलेल्या अंगणवाडी केंद्रांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार ३,८३२ केंद्रांना स्मार्ट अंगणवाडी करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
स्मार्ट अंगणवाडी योजनेतून प्रत्येक केंद्राला आधुनिक सुविधांनी युक्त किट उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये ई-लर्निंगसाठी आवश्यक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हात धुण्यासाठी बेसिन, अंगणवाडी इमारतीची रंगरंगोटी, आवश्यक किरकोळ दुरुस्ती, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि स्वयंपाकघराचे आधुनिकीकरण अशा सुविधांचा समावेश आहे.
राज्यातील अंगणवाडी केंद्रांचे टप्प्याटप्प्याने आधुनिकीकरण करून तेथील पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक साहित्य अधिक दर्जेदार करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे बालकांना पोषण, आरोग्य आणि प्रारंभिक शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा व गुणवत्तापूर्ण वातावरण उपलब्ध होईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.


