(रत्नागिरी / प्रतिनिधी)
युवकांमध्ये वाढत असलेल्या तंबाखू सेवनाच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आता शाळा-महाविद्यालयांमध्ये तंबाखूविरोधी जनजागृतीला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (NTCP) जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रभावी जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी संबंधित विभागांना दिले.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा समन्वय तथा सनियंत्रण समितीची बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. युवकांना व्यसनाच्या विळख्यात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. शाळा व महाविद्यालयांमध्ये तंबाखूविरोधी व्याख्याने, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, समुपदेशन सत्रे यांसारखे उपक्रम नियमितपणे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले. तंबाखू सेवनामुळे होणारे कर्करोग, हृदयरोग आणि श्वसनविकार यांसह शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.
युवकांमध्ये व्यसनाची सुरुवात होण्यापूर्वीच त्यांना त्याच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यासाठी केवळ जनजागृती कार्यक्रम न घेता विद्यार्थ्यांशी थेट संवाद, समुपदेशन आणि पालकांचा सहभाग वाढविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था निर्माण करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या परिसराची नियमित पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले. COTPA कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर आता प्रशासनाची नजर राहणार आहे.
तंबाखूविरोधी अभियान केवळ शासकीय यंत्रणेपुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. तंबाखूच्या व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींना योग्य समुपदेशन व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला. व्यसनमुक्तीसोबतच व्यसनाची सुरुवातच होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक जनजागृती अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
‘तंबाखूला नकार, निरोगी जीवनाला स्वीकार’
“युवक हे देशाचे भविष्य असून त्यांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर ठेवणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे,” असा संदेश देत ‘तंबाखूला नकार, निरोगी जीवनाला स्वीकार’ हा संदेश जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. युवकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि भावी पिढीला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी शाळा-महाविद्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याबरोबरच समाजाची मानसिकताही तंबाखूमुक्त करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.


