( रत्नागिरी/प्रतिनिधी )
जयगड येथील बहुचर्चित सीताराम वीर खून प्रकरणातील आरोपी क्रमांक ३ दर्शन शांताराम पाटील (५७) यांचे मुंबईतील जेजे रुग्णालयात मध्यरात्री उपचारादरम्यान निधन झाले. काही दिवसांपूर्वीच गंभीर आजारामुळे त्यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
दर्शन पाटील हे खुनी प्रवृत्तीचा ठपका असलेल्या दुर्वास पाटीलचे वडील होते. रत्नागिरीत सुरुवातीला त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले होते. जेजे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. संशयित आरोपी दर्शन पाटील यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह गावी आणण्याची तयारी सुरू असून, अंत्यविधी वाटद-खंडाळा येथील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या अंत्यविधीला तुरुंगात असलेला मुलगा दुर्वास पाटील उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच्या वकिलांनी यासंदर्भात न्यायालयात पत्र दाखल केले असून, पोलिसांचे मत देखील न्यायालयाकडून मागवले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, दिवंगत आरोपी पाटील यांना मधुमेह व रक्तदाबासारख्या दीर्घकालीन आजारांचा त्रास होता. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडलेली होती. अखेर दिनांक २९ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री रुग्णालयातील उपचारादरम्यान त्यांची जीवनयात्रा संपली. या घटनेमुळे जिल्ह्यातील अशा स्वरूपाची ही पहिलीच घटना ठरली आहे. खूनप्रकरणातील संशयित आरोपीला जामीन मिळाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू ओढवल्याने या प्रकरणाची मोठी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

