(दापोली / वार्ताहर)
मंडणगड-दापोली मार्गावर एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. आज (शनिवारी, २१ नोव्हेंबर) रोजी सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास खेर्डी येथील इंगळवाडी एसटी थांब्याजवळ ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंडणगडहून दापोलीच्या दिशेने एसटी बस येत होती. त्याचवेळी दापोलीकडून मंडणगडच्या दिशेने दुचाकीस्वार जात असताना खेर्डी येथील एसटी थांब्याजवळील दुकान परिसरात हा अपघात झाला. यावेळी दुचाकीस्वार एसटी बसच्या चाकाखाली अडकला.
या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृत दुचाकीस्वाराचे नाव सुरेंद्र गोरीवले असून, त्यांचे वय सुमारे ४० वर्षे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघाताचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.


