(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सुट्टी मिळण्याबाबत विचारणा करण्यासाठी गेल्याचा राग मनात धरून एका आचाऱ्याला शिवीगाळ करीत लाकडी बांबू आणि लोखंडी सळीने मारहाण केल्याची घटना मासेबाव येथील सिद्धिविनायक हॉटेलमध्ये घडली. या हल्ल्यात आचारी जखमी झाला असून, पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश गणपत रावणांग (वय ३७, रा. उक्षी, बनाचीवाडी, वरचीवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे जखमी आचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास निलेश रावणांग हे मासेबाव येथील सिद्धिविनायक हॉटेलमध्ये कामावर होते. यावेळी सुट्टी मिळण्याबाबत हॉटेलमालक दीपक रामगडे यांच्या भावाकडे विचारणा करण्यासाठी ते गेले होते. दरम्यान, आरोपी राजू यशवंत रामगडे (रा. करबुडे, ता. जि. रत्नागिरी) याने फिर्यादींनी दीपक रामगडे यांना धमकी दिल्याचा गैरसमज करून घेतला. याच रागातून त्याने निलेश यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लाकडी बांबूने पाठीवर मारहाण केली, तसेच लोखंडी सळीने डोक्यावर प्रहार करून त्यांना जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, पोलिसांत तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी निलेश रावणांग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू रामगडे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करीत आहेत.


