(लांजा /रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा उड्डाणपुलावर स्कॉर्पिओ आणि अल्ट्रोझ कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन सात जण जखमी झाल्याची घटना घडली. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ३.१५ वाजण्याच्या सुमारास लांजा बाजारपेठेतील नगरपंचायत कार्यालयासमोर हा अपघात झाला. याप्रकरणी राजस्थानमधील स्कॉर्पिओचालकाविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णकुमार हिराराम रबारी (वय २३, रा. नासोली, ता. भिनमाल, जि. जालोर, राजस्थान) असे संशयित स्कॉर्पिओचालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णकुमार हा जीजे ०२ डीपी ९९५९ क्रमांकाची स्कॉर्पिओ घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी लांजा उड्डाणपुलावर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्याने त्याने एमएच ०८ बीई १०६७ क्रमांकाच्या अल्ट्रोझ कारला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात अल्ट्रोझ कारचालकाच्या डोक्याला, कमरेला, उजव्या पायाला आणि उजव्या हाताला गंभीर व किरकोळ दुखापती झाल्या. तसेच कारमधील रेखा गुरव यांच्या पायाला, शितल गुरव यांच्या डाव्या हाताला, तर सुरेंद्र गुरव आणि सुजाता गुरव यांनाही गंभीर व किरकोळ दुखापती झाल्या. या अपघातात स्कॉर्पिओमधील चंपादेवी कृष्णकुमार रबारी आणि चार वर्षांची लक्षिता कृष्णकुमार रबारी यांचाही जखमींमध्ये समावेश आहे.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विलास धाकू जाधव यांनी फिर्याद दिली आहे. अपघाताच्या तपासाअंती स्कॉर्पिओचालक कृष्णकुमार रबारी याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत.


