(रत्नागिरी /प्रतिनिधी)
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील दोन पितळी घंटा अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अवघ्या तासाभराच्या अंतराने दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून या घंटांची चोरी करण्यात आली. या चोरीत देवस्थानचे सुमारे १६ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणपतीपुळे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील तळ्याजवळ असलेल्या फायबर शेडच्या लोखंडी बारला लोखंडी साखळीने बांधून ठेवलेली पहिली पितळी घंटा १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.५४ वाजण्याच्या सुमारास चोरीला गेली. त्यानंतर प्रदक्षिणा मार्गावरील उताराच्या पूर्वेकडील देवळी परिसरात लोखंडी रॉडला अडकवलेली दुसरी पितळी घंटाही सायंकाळी ६.०३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. चोरीला गेलेल्या पहिल्या घंटाचे वजन अंदाजे तीन किलो असून, तिची किंमत १२ हजार रुपये आहे. तर दुसऱ्या घंटाचे वजन अंदाजे एक किलो असून, तिची किंमत चार हजार रुपये आहे. अशा एकूण १६ हजार रुपये किमतीच्या दोन पितळी घंटा चोरट्याने लंपास केल्या आहेत.
याप्रकरणी संस्थान श्रीदेव गणपतीपुळेचे सरपंच निलेश श्रीकृष्ण कोल्हटकर (वय ४९, रा. गणपतीपुळे) यांनी जयगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील घंटाच चोरीला गेल्याने भाविकांमधून आश्चर्य व्यक्त होत असून, चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. Generate image


