(रत्नागिरी / प्रतिनिधी)
नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरची रात्र जल्लोषाची असली, तरी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस दल सज्ज झाले आहे. निवडणुकांचा हंगाम सुरू असल्याने यंदा पोलिस प्रशासन अधिक सतर्क असून ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन दिवसांत जिल्हाभर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
‘थर्टी फर्स्ट’च्या जल्लोषात मद्यप्राशन करून वाहन चालविणे, मारामारीचे प्रकार आणि अपघातांचे प्रमाण वाढते. याला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून दोन्ही दिवशी जागोजागी नाकाबंदी करण्यात येणार असून ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार असल्याने जल्लोष करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
अनेक ठिकाणी आडवळणाच्या, बायपास रस्त्यांवर गुप्तपणे पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अशा ठिकाणांकडेही पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाणार असून संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई केली जाईल. मद्यप्राशन करून वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा असून पहिल्या वेळी १० हजार रुपये दंड आणि/किंवा सहा महिन्यांपर्यंत कारावास, तर दुसऱ्या व पुढील गुन्ह्यासाठी १५ हजार रुपये दंड आणि/किंवा दोन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
पोलिसांचा कडक वॉच
‘थर्टी फर्स्ट’च्या पार्ट्यांवर जिल्हाभर पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. कोणत्याही कार्यक्रमासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असून नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई अटळ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हॉटेल्ससाठी वेळेची अट
३१ डिसेंबर २०२५ आणि १ जानेवारी २०२६ रोजी हॉटेल्स व कार्यक्रमस्थळे रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी जिल्हा प्रशासनाची अधिकृत परवानगी घेणे बंधनकारक आहे.
पोलिस अधीक्षकांचा इशारा
३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या कार्यक्रमांसाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री सर्वत्र नाकाबंदी करून वाहनचालकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी केली जाईल. नववर्षाचा आनंद घ्या, पण नियम मोडू नका. अन्यथा कारवाई होणारच.
— नितीन बगाटे, जिल्हा पोलिस अधीक्षक, रत्नागिरी

