(मंडणगड / वार्ताहर)
तालुक्यातील दहागाव किराणा मालाच्या स्टॉपवरील ‘अमीर किराणा व जनरल स्टोअर्स’ या दुकानात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली २ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केली. दुकानाच्या सिमेंट पत्र्यांचे छत उचकटून चोरट्याने आत प्रवेश केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना ३१ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजल्यापासून १ सप्टेंबर रोजी पहाटे ४.३० वाजण्यापूर्वीच्या कालावधीत घडली. रात्रीच्या वेळी दुकान बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने दुकानावरील सिमेंट पत्रे काढून आत प्रवेश केला. त्यानंतर काउंटरचा ड्रॉवर उघडून त्यामध्ये ठेवलेली २ हजार २०० रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटा पसार झाला. सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर दुकानमालक सिकंदर इसाक जोगीलकर (वय ५६, रा. दहागाव स्टॉप, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीच्या आधारे अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३३१ (४) आणि ३०५ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५३ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, दुकानात प्रवेश करण्यासाठी चोरट्याने छतावरील सिमेंट पत्रे काढल्याने पोलिसांसमोर चोरट्याचा माग काढण्याचे आव्हान उभे राहिले आहे. घटनास्थळावरील परिस्थितीचा तसेच उपलब्ध पुराव्यांचा तपास करून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे काम मंडणगड पोलिसांकडून सुरू आहे.

