(जाकादेवी / संतोष पवार)
धम्मपद या विषयावर तिसऱ्या युवा परिषदेचे आयोजन रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. शहरातील नाचणे रोड, मारुती मंदिर परिसरातील जोगळेकर हॉलमध्ये सकाळी १० वाजता ही परिषद होणार आहे. यावेळी डी. एल. कांबळे आणि श्रमण शिक्षा अभियानाचे पूज्य भंते संघपाल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या युवा परिषदेच्या माध्यमातून यापूर्वी दोन वैचारिक परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. पहिली युवा परिषद ‘बुद्ध की काल मार्क्स’ या विषयावर रत्नागिरी येथे झाली होती. या परिषदेत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डॉ. वृत्तांत मानवटकर यांनी मार्गदर्शन केले होते. त्यानंतर ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ या विषयावर दुसरी युवा परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत औरंगाबाद येथील डॉ. राहुल ब्राह्मणे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले होते.
आता तिसऱ्या युवा परिषदेत ‘धम्मपद’ या विषयावर बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे गाढे अभ्यासक आणि प्रसिद्ध लेखक डी. एल. कांबळे हे मार्गदर्शन करणार आहेत. पूज्य भंते संघपाल यांच्या उपस्थितीत हा वैचारिक कार्यक्रम पार पडणार आहे.
या परिषदेला फुले, शिवराय, शाहू आणि आंबेडकरी विचारधारेतील विचारवंतांसह तरुणाईने मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक निहाल हातखंबेकर आणि सौरभ आयरे यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे केले आहे.


