(रत्नागिरी / वार्ताहर)
मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध मद्य वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली. गुरुवारी (१९ नोव्हेंबर) करण्यात आलेल्या या कारवाईत गोवा बनावटीच्या ‘रॉयल ब्लू व्हिस्की’चे १,४०० बॉक्स असलेला सहाचाकी अशोक लेलंड ट्रक पकडण्यात आला. या कारवाईमुळे अवैध मद्य वाहतुकीचे मोठे प्रकरण उघडकीस आले आहे.
जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत १ कोटी ४७ लाख ८४ हजार रुपये आहे. तर मद्याच्या साठ्यासह ट्रक असा एकूण १ कोटी ७५ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी सातारा येथील ट्रकचालक सचिन सपकाळ याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री अथवा वाहतूक होत असल्याची माहिती नागरिकांकडे असल्यास त्यांनी विभागाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.


