पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम, कंपनीकडून जमा होणारे मासिक योगदान आणि अलीकडील व्यवहारांची माहिती मिळवण्यासाठी आता ईपीएफओच्या वेबसाइटवर लॉगिन करण्याची गरज राहणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) व्हॉट्सॲपच्या माध्यमातून खातेदारांसाठी नवी सेवा सुरू केली असून, केवळ ‘Hi’ असा संदेश पाठवून पीएफ खात्याशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळवता येणार आहे. या सुविधेद्वारे खात्यातील शिल्लक, शेवटचे पाच व्यवहार आणि पासबुक डाउनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ही सेवा १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. ईपीएफओने एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या १४ दिवसांत ८९.८८ लाख सदस्यांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्या पीएफ खात्यातील शिल्लक तपासली आहे. या आकडेवारीवरून नव्या सुविधेला खातेदारांकडून मिळालेला प्रतिसाद स्पष्ट होतो.
व्हॉट्सॲप सेवेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम ईपीएफओचा अधिकृत क्रमांक +९१ ८७९६४४१८०० मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सॲपवर या क्रमांकाला ‘Hi’ असा संदेश पाठवावा. पुढील प्रक्रियेत उपलब्ध पर्यायांमधून भाषा निवडून आवश्यक पडताळणी पूर्ण करावी लागेल. या सुविधेचा वापर करण्यासाठी व्हॉट्सॲपवर नोंदणीकृत असलेला मोबाईल क्रमांक सदस्याच्या UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) शी जोडलेला असणे आवश्यक आहे.
पडताळणी पूर्ण झाल्यानंतर खातेदाराला PF Balance, Last 5 Transactions आणि Passbook Download असे पर्याय दिसतील. त्यापैकी आवश्यक पर्याय निवडल्यानंतर संबंधित माहिती थेट व्हॉट्सॲपवर मिळेल. त्यामुळे पीएफ खात्यातील एकूण शिल्लक किती आहे, अलीकडे कोणते व्यवहार झाले आहेत आणि पासबुकमध्ये कोणत्या नोंदी आहेत, हे मोबाईलवरूनच तपासता येणार आहे.
या सेवेचा वापर अधिक सोपा करण्यासाठी ईपीएफओने QR कोडची सुविधाही उपलब्ध केली आहे. संघटनेने प्रसिद्ध केलेला अधिकृत QR कोड स्कॅन करून व्हॉट्सॲप सेवा सुरू करता येते. त्यानंतर ‘Hi’ असा संदेश पाठवून आवश्यक सेवा निवडता येईल.
मात्र, पीएफ खात्याची माहिती मिळवताना खातेदारांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासाठी केवळ ईपीएफओने दिलेल्या अधिकृत क्रमांकाचाच वापर करावा. अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळावे. तसेच UAN पासवर्ड किंवा OTP कोणत्याही व्यक्तीला सांगू नये.


