(गोंदिया / वृत्तसंस्था)
पुण्यातील खासगी विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून कार्यरत असलेल्या 35 वर्षीय वर्षा तुरकर हिच्या निर्घृण हत्येप्रकरणी गोंदिया पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत तपासाची उकल केली आहे. दिवाळीच्या सुटीसाठी माहेरी आलेल्या वर्षाची 14 नोव्हेंबर रोजी धारदार चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेची माहिती 16 नोव्हेंबरला राज्यभर पसरल्यानंतर आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर या प्रकरणात नितेश अग्रवाल याची पत्नी मोना अग्रवाल हिला अटक करण्यात आली आहे. हत्येच्या दिवशी नितेश आणि वर्षा एकत्र असल्याचेही तपासात समोर आले आहे.
या हत्येच्या कटातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे वर्षा आणि नितेश जंगल परिसरात नेमके कुठे आहेत, याची माहिती हल्लेखोरांना GPS ट्रॅकिंगच्या माध्यमातून मिळाली होती. नितेश वर्षाला ज्या कारमधून घेऊन फिरत होता, ती कार त्याची पत्नी मोना अग्रवाल हिच्या नावावर होती. या वाहनामध्ये टोयोटा आय-कनेक्ट ही GPS ट्रॅकिंग प्रणाली बसवण्यात आली होती. मोनाने या प्रणालीचा आयडी आणि पासवर्ड हल्लेखोरांच्या मोबाईलमध्ये लॉगिन करून दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे नितेशच्या कारचे अचूक लोकेशन हल्लेखोरांना त्यांच्या मोबाईलवर पाहता येत होते.
नितेशची कार बोंडराणी जंगल परिसरात थांबल्याची माहिती मिळताच हल्लेखोरांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर वर्षा हिच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. अशा प्रकारे GPS ट्रॅकिंग प्रणालीचा वापर करून लोकेशन मिळविण्यात आले आणि त्यानुसार हत्येचा कट अंमलात आणल्याचा संशय पोलिस तपासातून व्यक्त करण्यात येत आहे. या संपूर्ण कटामागे मोना अग्रवाल असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बोंडराणी जंगल परिसरात वर्षा तुरकर हिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर दवनीवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासासाठी सहा स्वतंत्र पथके तयार केली. तिरोडा, खैरलांजी, वारासिवनी तसेच बालाघाट ते गोंदिया या मार्गावरील सुमारे 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज सलग चार दिवस तपासण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणामागे विवाहबाह्य संबंधांचा संशय, आर्थिक व्यवहार आणि GPS ट्रॅकिंगचा वापर करून आखलेला हत्येचा कट असल्याचे तपासातून समोर येत आहे. वर्षा आणि नितेश यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय नितेशची पत्नी मोना हिला होता. त्याच संशयातून तिने हत्येचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय वर्षाने नितेशला व्यवसायासाठी मोठी आर्थिक मदत केली होती, असा दावाही वर्षाच्या कुटुंबीयांनी केला आहे. हत्येमागील नेमके कारण आणि या कटात सहभागी असलेल्या प्रत्येकाची भूमिका यांचा तपास पोलीस करत आहेत.
वर्षा तुरकर हिने काही वर्षांपूर्वी एव्हिएशन क्षेत्रात काम करणाऱ्या समर सय्यद याच्याशी प्रेमविवाह केला होता. नोकरीच्या निमित्ताने ती आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसह पुण्यातील धानोरी परिसरात राहत होती, तर तिचा पती समर इंदूर येथे कार्यरत आहे. दिवाळीच्या सुटीसाठी ती माहेरी आली असतानाच तिची हत्या झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, GPS ट्रॅकिंगच्या माध्यमातून हत्येचा कट रचल्याचा तपासातील खुलासा या प्रकरणाला वेगळे वळण देणारा ठरला आहे.


