(सिंधुदुर्ग / वृत्तसंस्था)
सोशल मीडियावर तरुण असल्याचे भासवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर, इन्स्टाग्रामवर बनावट ओळख आणि त्यातून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा धक्कादायक प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात उघडकीस आला आहे. स्वतःचे वय १७ वर्षे असल्याचे सांगणारा ‘मंथन’ प्रत्यक्षात ३९ वर्षीय विवाहित पुरुष असल्याचे तपासात समोर आले आहे. महेंद्र गणपत घाडीगावकर असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, तो एका मुलीचा पिता आहे. १४ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २१ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कणकवली तालुक्यातील एका शाळेत नववीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीची जानेवारी २०२६ मध्ये इन्स्टाग्रामवरून महेंद्रशी ओळख झाली होती. त्याने ‘मंथन’ या नावाने बनावट अकाउंट तयार केले होते. या अकाउंटवर एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःचा चेहरा तरुण कॉलेज विद्यार्थ्यासारखा दिसेल असा बदलला होता. आपण १७ वर्षांचे असून कणकवलीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे सांगून त्याने मुलीचा विश्वास संपादन केला. प्रत्यक्षात तो ३९ वर्षांचा विवाहित असून, मित्राच्या नावावरील सिमकार्डचा वापर करून सोशल मीडियावर संपर्क साधत होता.
ऑनलाइन संवादातून निर्माण झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने मुलीला विविध आमिषे आणि भुलथापा देऊन आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. जानेवारीमध्ये सुरू झालेली ही ओळख जुलै २०२६ पासून प्रत्यक्ष भेटींपर्यंत पोहोचली. कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असरोंडी गावाजवळ रस्त्यापासून सुमारे 300 ते 400 मीटर आत असलेल्या जंगल परिसरात या भेटी होत असल्याचे तपासात पुढे आले आहे. जंगलात आडवाटेला नेऊन पाच ते सातवेळा अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी घरातून वेगवेगळी कारणे सांगून शाळेच्या वेळेपूर्वी बाहेर पडत असे. त्यानंतर महेंद्र मोटारसायकल घेऊन तेथे पोहोचत असे आणि तिला दुचाकीवरून निर्जन जंगल परिसरात घेऊन जात असे. जुलै २०२६ ते 5 नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा प्रकार सुरू होता. या काळात त्याने मुलीवर पाच ते सात वेळा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
मुलीची मासिक पाळी चुकल्यानंतर घरच्यांना संशय आला. त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता संपूर्ण प्रकार उघड झाला. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कणकवली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी तपासाची सूत्रे हाती घेत मालवण येथील महेंद्र घाडीगावकर याच्या घरातून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान संशयिताने सुरुवातीला दिशाभूल करणारी उत्तरे देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फोटो पीडित मुलीला दाखवण्यात आल्यानंतर तिने त्याला ओळखले. त्यामुळे ‘मंथन’ या नावामागे लपलेली खरी ओळख उघड झाली. संशयित एका बागेत मोलमजुरीचे काम करत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी कणकवली पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार (POCSO) गुन्हा दाखल करून महेंद्रला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २१ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या गैरवापराचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बनावट फोटो, खोटी वयाची माहिती आणि आभासी ओळखीच्या माध्यमातून अल्पवयीन मुलांना लक्ष्य केले जाऊ शकते, हे या घटनेतून समोर आले आहे. पालकांनी मुलांच्या मोबाइल आणि सोशल मीडिया वापरावर लक्ष ठेवण्याबरोबरच त्यांच्याशी विश्वासाचे नाते निर्माण करून ऑनलाइन जगातील धोके समजावून सांगणे आवश्यक असल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे.


