(अकोला / वृत्तसंस्था)
अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत असतानाच अकोल्यातून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली अघोरी पूजा करण्यात आल्याचा आणि त्यातून एका तरुणाचा नरबळी दिला गेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. शहरातील मोठी उमरी परिसरात राहणाऱ्या हेमंत सपकाळ या २९ वर्षीय तरुणाचा मध्य प्रदेशातील इंदूर येथे संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जादूटोणा आणि गुप्तधन शोधण्याच्या अघोरी प्रकारातून मित्रानेच हेमंतचा खून करून नरबळी दिल्याचा गंभीर संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून, यासंदर्भात 18 नोव्हेंबर 2026 रोजी मृताचा भाऊ मुकुंद सपकाळ यांनी अकोल्यातील सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार सादर केली आहे.
मुकुंद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 12 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान हेमंत हा त्याचे परिचित विवेक ऊर्फ विक्की शिंदे, अजय गायकवाड आणि अन्य एका व्यक्तीसोबत अमरावतीला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत त्याचे कुटुंबीयांशी फोनवर नियमित संभाषण सुरू होते. दुसऱ्या दिवशी घरी परतणार असल्याचेही त्याने कुटुंबीयांना सांगितले होते.
मात्र, 15 नोव्हेंबरच्या सायंकाळी हेमंतचा फोन आल्यानंतर कुटुंबीयांची चिंता वाढली. तो प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत बोलत होता. “माझा जीव धोक्यात आहे, हे लोक मला आज रात्री मारणार आहेत,” असे सांगत त्याने मदतीची विनंती केली. आपण अमरावतीला नसून इंदूर येथे असल्याचे आणि संबंधित व्यक्तींनीच आपल्याला तिथे आणल्याचे त्याने स्पष्ट केले. “मी सध्या त्यांच्यापासून दूर आहे, पण विक्की व्यक्ती मला फोन करून सतत तिकडे बोलावत आहे, मला वाचवा,” अशी आर्त विनवणीही त्याने केली. कुटुंबीयांनी त्याला विक्की किंवा त्याच्या साथीदारांकडे पुन्हा न जाण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यानंतर हेमंतचा मोबाईल बंद झाला.
याच रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मुकुंद यांनी विवेक ऊर्फ विक्की शिंदे याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी आम्ही रेल्वेमध्ये असून हेमंत मागील डब्यात असल्याचे त्याने सांगितल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता हेमंतचा बंद असलेला मोबाईल पुन्हा सुरू झाला. मुकुंद यांनी त्या क्रमांकावर फोन केला असता, इंदूर येथील एम.जी. रोड पोलीस ठाण्यातील पोलिसांनी फोन उचलला. हेमंतचा मृत्यू झाल्याची माहिती देत त्यांनी कुटुंबीयांना तातडीने इंदूर येथे येण्यास सांगितले.
ही माहिती मिळताच सपकाळ कुटुंबीय इंदूरला रवाना झाले. 17 नोव्हेंबर रोजी हेमंतचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह अकोला येथील स्मशानभूमीत आणण्यात आला आणि तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, या मृत्यूमागे जादूटोणा आणि गुप्तधन शोधण्याच्या अघोरी प्रकाराचा संबंध असल्याचा संशय कुटुंबीयांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. विवेक ऊर्फ विक्की शिंदे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच तो जादूटोणा आणि गुप्तधन शोधण्यासारखे प्रकार करत असल्याचे व्हिडिओ उपलब्ध असल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे. याच अघोरी कृत्यासाठी विक्की शिंदे आणि त्याच्या साथीदारांनी हेमंतचा खून करून त्याचा नरबळी दिला असावा, अशी दाट शंका त्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून संबंधित आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी मुकुंद सपकाळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे.


