(चिपळूण / प्रतिनिधी)
मासेमारीसाठी नदीकाठी गेलेल्या एका वृद्धाचा पाय घसरून नदीपात्रात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील कापसी नदी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वसंत विठ्ठल कातळकर (वय ६५, रा. ताम्हणमळा-देऊळवाडी, चिपळूण) असे मृत वृद्धाचे नाव आहे. शनिवारी मासे पकडण्यासाठी ते एकटेच कापसी नदीकाठी गेले होते. मासेमारी करत असताना अचानक तोल जाऊन ते नदीच्या पाण्यात पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बराच वेळ घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. यावेळी गुळवणी फाट्याजवळील पुलाखाली ते पडलेल्या अवस्थेत आढळून आले. नातेवाईकांनी तातडीने त्यांना बाहेर काढून कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती त्यांचे पुतणे सुरेंद्र राजाराम कातळकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. कापसी नदी परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कातळकर कुटुंबावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

