(चिपळूण / रत्नागिरी)
वापरातील गॅस सिलिंडर तातडीने देण्याच्या मागणीवरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील विकासवाडी परिसरात घडली. सिलिंडर देण्यासाठी एक दिवसाची मुदत मागितल्याने शिवीगाळ करून रॉडने डोक्यात आणि खांद्यावर मारहाण केल्याची तक्रार भाड्याने राहणाऱ्या ४२ वर्षीय व्यक्तीने चिपळूण पोलिसांत दिली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहीदुल अमीरुद्दीनमिया हक (वय ४२, मूळ रा. कुचबिहार, पश्चिम बंगाल) हे खेर्डी येथील बळवंत पाटील विकासवाडी परिसरात भाड्याने राहतात. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ते आपल्या खोलीत जेवण करून आराम करत होते. त्यावेळी अब्बास मिया (वय ४७), मनिजा बीबी (वय ४५) आणि राजीव मिया (वय २१, तिघेही रा. खेर्डी) हे त्यांच्या खोलीत आले. त्यांनी वापरातील सिलिंडर तातडीने देण्याची मागणी केली. यावेळी हक यांनी सिलिंडर दुसऱ्या दिवशी देण्याची तयारी दर्शवत एक दिवसाची मुदत मागितली. मात्र, यावरून वाद झाल्याचा आरोप आहे. तिघांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अब्बास मिया याने स्वयंपाकघरातील मसाला कुटण्याचा लोखंडी रॉड घेऊन हक यांच्या डोक्यावर मारल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याचवेळी राजीव मिया याने अब्बासच्या हातातील रॉड घेऊन हक यांच्या डाव्या खांद्यावर मारल्याचा आरोप आहे.
तसेच अब्बास मिया यांच्या पत्नीने झाडूने मारहाण करण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या घटनेप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.


