(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरालगतच्या मिरजोळे पाटीलवाडी परिसरात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरात कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने आणि ३५ हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. गुरुवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मिरजोळे पाटीलवाडी येथील राजेश बबन भाटकर यांच्या मालकीच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. राजेश भाटकर हे मिरजोळे ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असून त्यांच्या पत्नी अंगणवाडी सेविका आहेत. घटनेच्या वेळी दोघेही कामानिमित्त घराबाहेर होते, तर त्यांची दोन्ही मुलेही वैयक्तिक कारणास्तव बाहेर गेली होती. याचाच फायदा घेत चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घरावर डल्ला मारला.
प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी घराच्या मागील बाजूच्या दरवाज्याजवळील खिडकीतून अँगल टाकून आतील कडी उघडली आणि घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील प्रत्येक खोलीतील सामानाची उलथापालथ करत संपूर्ण घर अस्ताव्यस्त केले. लोखंडी कपाट उचकटून त्यामधील १० तोळे सोन्याचे दागिने तसेच ३५ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. दरम्यान, राजेश भाटकर यांच्या पत्नी घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडा असल्याचे आणि घरातील सामान विस्कळीत अवस्थेत दिसून आले. कपाट फोडल्याचे लक्षात येताच चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तात्काळ गावचे पोलीस पाटील, शेजारी तसेच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी घराचा पंचनामा करून पुरावे संकलित केले. तसेच चोरट्यांचा माग काढण्यासाठी फॉरेन्सिक लॅबचे पथक आणि श्वानपथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या प्रकरणी राजश्री भाटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक पुरावे आणि इतर बाबींच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून चोरट्यांचा कसून शोध सुरू केला आहे.

