(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरीतील निसर्गरम्य आणि पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर रविवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाचा जीव स्थानिकांच्या तत्परतेमुळे वाचवण्यात आला. या घटनेमुळे किनारपट्टी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भानुशाली कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर-विरार परिसरातून एक कुटुंब रविवारी सकाळी पर्यटनासाठी आरे-वारे समुद्रकिनारी आले होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास संतोष शशिकांत भानुशाली आणि सुयोग राजेश भानुशाली हे दोघे समुद्रात उतरले असता, पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने ओहोटीच्या तीव्र प्रवाहाने त्यांना आत ओढले. काही क्षणांतच दोघेही पाण्यात अडकून मदतीसाठी झुंज देऊ लागले.
या प्रसंगी किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी आणि पोलीस पाटील आदेश कदम यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ समुद्रात धाव घेत बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर सुयोग राजेश भानुशाली (वय २१, रा. विरार) याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
मात्र, संतोष शशिकांत भानुशाली (रा. पालघर) यांना वाचवण्याचे प्रयत्न अपुरे पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या या घटनेने पर्यटकांमध्येही चिंता निर्माण झाली असून, स्थानिकांनी समुद्रात उतरताना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. आरे-वारेसारख्या किनाऱ्यांवर समुद्राचा प्रवाह क्षणात बदलू शकतो; त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखणे आणि स्थानिकांच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.

