(संगमेश्वर /प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर राजवाडी येथील केदारनाथ मंदिराजवळ भरधाव दुचाकीने धडक दिल्याने ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. शंकर गणपत गुरव (रा. राजवाडी गुरववाडी, ता. संगमेश्वर) असे जखमींचे नाव आहे. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
याप्रकरणी शंकर गणपत गुरव यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते मनोज किंजळकर यांच्या हॉटेलमध्ये चहा पिऊन मुंबई-गोवा महामार्ग ओलांडून केदारनाथ मंदिराच्या दिशेने जात होते. यावेळी चिपळूणकडून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या होंडा शाईन मोटारसायकलवरील चालक संजय नंदकुमार शिगवण (वय ४७, रा. शंकरवाडी, चिपळूण) याने दुचाकी भरधाव वेगाने चालवून गुरव यांना जोरदार धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या धडकेत गुरव यांना किरकोळ दुखापत झाली.
या प्रकरणी दुचाकीचालक संजय शिगवण याच्याविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१ आणि १२५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


