(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र पावस येथे हजरत शेख महंमद पीर यांच्या उरूसाला २२ नोव्हेंबर २०२६ पासून प्रारंभ होणार आहे. सुमारे २२५ वर्षांची परंपरा लाभलेला हा उरूस दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. यानिमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उरूसाच्या पहिल्या दिवशी, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०.३० वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर समाधीवर चंदन चढवून धार्मिक विधींना प्रारंभ होईल. दुसऱ्या दिवशी, २३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता समाधीवर सामुदायिक पद्धतीने महावस्त्र (गिलाफ) परिधान करण्याचा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.
उरूसाची सांगता २४ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार असून, या दिवशी भाविकांना दर्शनासोबत महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे. रात्री ७.३० ते १० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
हजरत शेख महंमद पीर हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. नवस फेडण्यासाठी तसेच आशीर्वाद घेण्यासाठी सर्व धर्मीय भाविक दरवर्षी मोठ्या श्रद्धेने येथे उपस्थित राहतात. उरूसाच्या निमित्ताने परिसरात चहा, थंड पेये, खाद्यपदार्थ आणि प्रसाद साहित्याची दुकाने सज्ज होत असून, तीन दिवस पावस परिसरात उत्सवी वातावरण निर्माण होते.
या धार्मिक सोहळ्याचे व्यवस्थापन शेख महंमद पीर दर्गा ट्रस्ट, पावस यांच्याकडून करण्यात येत आहे. मुस्लीमीन दख्खनी मोहल्ला व दर्ग्याचे मुजावर दाऊद महमूद मुजावर यांनी सर्व भाविकांनी उरूसात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
(फोटो : दिनेश पेटकर, गावखडी)


