(संगमेश्वर /प्रतिनिधी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर ओझरखोल येथे आयशर डंपर आणि रिक्षाची जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक तेजस महेंद्र जाधव (वय ३१, रा. कुरधंडा बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८.१० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत वैभव रविंद्र शिंदे (वय २८, रा. लोवले वरचेवाठार, ता. संगमेश्वर) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील आयशर डंपर (एमएच ०८ बीके ०००५) घेऊन भातगाव ते ओझरखोल असा मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करीत होते. यावेळी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचा चालक तेजस जाधव याने रिक्षा भरधाव वेगात चालवून डंपरला जोरदार धडक दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या धडकेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून रिक्षाचालक स्वतःही जखमी झाला. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात रिक्षाचालक तेजस महेंद्र जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


