(रत्नागिरी /प्रतिनिधी)
देशात इलेक्ट्रिक क्रांतीचे मोठे दावे करणाऱ्या ‘ओला इलेक्ट्रिक’ कंपनीच्या भोंगळ आणि बेजबाबदार कारभाराचा फटका आता थेट सामान्य ग्राहकांना बसू लागला आहे. शहरातील नाचणे रोड परिसरातील यशोधन अपार्टमेंटमध्ये असलेले ओला इलेक्ट्रिकचे अधिकृत शोरूम मे २०२६ पासून कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आले आहे. कंपनीच्या या मनमानी कारभारामुळे दुरुस्तीसाठी दिलेल्या ग्राहकांच्या दुचाकी शोरूममध्येच धूळ खात पडून आहेत. अखेर कंपनीच्या मुख्य कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने गाळामालक सुनील दत्ताराम भोंगले यांनी शोरूममधील वाहने व साहित्य हलवून गाळ्याचा ताबा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नाचणे रोडवरील यशोधन अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील गाळा क्रमांक १६ हा सुनील भोंगले यांच्या मालकीचा आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनीने रत्नागिरीतील विक्री केंद्र आणि सर्व्हिस सेंटरसाठी हा गाळा भाड्याने घेतला होता. मात्र, मे महिन्यापासून कंपनीचे येथील कामकाज अचानक ठप्प झाले. विशेष म्हणजे, कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनीही जबाबदारी झटकत, मुख्य कार्यालयाकडून कोणत्याही सूचना मिळत नसल्याचे कारण पुढे केले आणि शोरूमच्या कुलुपांच्या चाव्या थेट गाळामालकांच्या हाती सोपवून काढता पाय घेतला. यानंतर गाळामालक सुनील भोंगले आणि त्यांचे मुखत्यारपुत्र सिद्धार्थ भोंगले यांनी ओलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्राहकांच्या आणि मालमत्ताधारकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याच्या आपल्या सवयीप्रमाणेच कंपनीने याकडेही कानाडोळा केला. अखेर भोंगले यांनी वकिलांमार्फत कंपनीला कायदेशीर नोटीस बजावून शोरूममधील वाहने आणि यंत्रसामग्री हलवण्याचा इशारा दिला. मात्र, नोटीस देऊन महिना उलटला तरी कंपनीच्या मुजोर प्रशासनाने साधे उत्तर देण्याचीही तसदी घेतली नाही. कंपनीच्या या कमालीच्या उदासीनतेनंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शोरूम उघडून आतील वाहने व साहित्य हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रिया पाळत याबाबत शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक, जिल्हाधिकारी, महसूल अधिकारी आणि रत्नागिरीचे मुख्य न्यायदंडाधिकारी यांना लेखी कळविण्यात आले आहे.
दरम्यान, आपल्या हक्काच्या दुचाकी दुरुस्तीसाठी देऊन फसवणूक झालेल्या ग्राहकांनी आरटीओची मूळ मालकी हक्क कागदपत्रे, शोरूमची दुरुस्ती पावती आणि त्यांच्या छायांकित प्रती सादर कराव्यात. तसेच रीतसर पावती आणि फोटो देऊन आपली वाहने ताब्यात घ्यावीत, असे जाहीर आवाहन सिद्धार्थ भोंगले यांनी कुलमुखत्यार या नात्याने केले आहे. मोठ्या गाजावाजात वाहने विकणाऱ्या ओला कंपनीने सेवा देण्याऐवजी गाशा गुंडाळल्याने रत्नागिरीतील वाहनमालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.


