(रत्नागिरी /प्रतिनिधी)
सावर्डे पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडी आणि मोबाइल टॉवरच्या बॅटऱ्या चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणी पालघर जिल्ह्यातील विरार आणि नालासोपारा परिसरातील चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, चोरीच्या तीन बॅटऱ्यांसह गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि अन्य साहित्य असा एकूण ४ लाख २२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१ (४) आणि ३०५ (अ) नुसार घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित वाहन आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तपास करीत होते. दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी ते चिपळूण विभागात पेट्रोलिंग सुरू असताना मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी फाट्यापुढील ग्रीन पार्क फॅमिली रेस्टॉरंटसमोर संशयित वाहन उभे असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये जयप्रकाश एकनाथ चिंदरकर (३२), नवनाथ भगवान उतेकर (३६), कौशिक प्रभाकर जाधव (२७) आणि मंगेश मनोज गुरव (२०, सर्व रा. पालघर जिल्हा) हे आढळून आले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत संबंधितांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मोबाइल टॉवरच्या तीन बॅटऱ्या, त्यांची किंमत २२ हजार ५०० रुपये, तसेच गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन आणि अन्य साहित्य असा एकूण ४ लाख २२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेले चारही संशयित आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी सावर्डे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
या कारवाईमुळे घरफोडी व चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाला महत्त्वाचे यश मिळाले आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस हवालदार विजय आंबेकर, वैभव मोरे, गणेश सावंत आणि चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे यांचा समावेश होता.


