(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
जिल्ह्यात इंधनाचा साठा पुरेसा असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले असतानाही गॅसच्या उपलब्धतेबाबत वेगवेगळ्या स्तरांवरून समोर येणाऱ्या विरोधाभासी माहितींमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही गॅस वितरकांकडून साठा मर्यादित असल्याचे सांगितले जात असताना, व्यावसायिक गॅसचा पुरवठा तात्पुरता थांबविण्याच्या सूचना कंपन्यांकडून मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. परिणामी, विशेषतः हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी अलीकडेच जिल्ह्यातील इंधनसाठा पुरेसा असल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले होते. तसेच इंधनसाठ्याची साठेबाजी करणारे अथवा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला होता. या भूमिकेमुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, प्रत्यक्षात काही गॅस वितरकांकडून घरगुती गॅस सिलिंडरचा साठा मर्यादित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी काही दिवस गॅसचा वापर जपून करावा, असेही सुचवले जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम अधिकच वाढला आहे.
दरम्यान, जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची भीती व्यक्त होत असून त्याचा परिणाम गॅसच्या दरांवरही दिसू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती १४.२ किलो गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होऊन तो ८६३.५० रुपयांवरून ९२३.५० रुपये झाला आहे. तर व्यावसायिक वापरासाठीचा १९ किलोचा सिलिंडर १,७४७ रुपयांवरून १,८६१ रुपये इतका महागला आहे. या दरवाढीमुळे हॉटेल व खाद्यव्यवसायिकांचे गणितही बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे पुरवठ्याबाबत संभ्रम आणि दुसरीकडे दरवाढ यामुळे नागरिकांसह व्यावसायिकही चिंतेत सापडले आहेत.

