(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचा मनमानी कारभार आणि एसटी चालकांचा सुसाट वेग यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास खेडशी येथे रत्नागिरी-कर्नाटक एसटी बसने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ठेकेदार कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता केलेले अचानक ‘डायव्हर्जन’ आणि एकाच मार्गिकेवरून सुरू असलेली दुतर्फा वाहतूक या अपघाताला कारणीभूत ठरल्याचा संतप्त आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
खेडशी येथील राधाकृष्ण ग्रेनाईट टाईल्स दुकानासमोर हा भीषण अपघात घडला. ललित रामचंद्र खेडसकर (वय ५३, रा. खेडशी) हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच ०८ एजे १२२०) रस्ता ओलांडत होते. त्याच वेळी रत्नागिरीहून भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (क्र. केए २२ एफ २३८०) बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की खेडसकर यांच्या हाताला, पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच खेडशी बीटचे पोलीस अंमलदार कदम, गणपत झोरे आणि हातखंबा बीटचे अंमलदार भिसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पालवे यांनीही घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी उपस्थित होते. ज्या ठिकाणी हा भीषण अपघात घडला, नेमक्या त्याच भागात रस्ता ओलांडण्यासाठी ठेकेदार कंपनीने ‘ओपनिंग’ (दुभाजकातील जागा) ठेवले आहे. मात्र, भरधाव वाहतुकीच्या या महामार्गावर कोणत्याही सुरक्षा उपाययोजनांशिवाय किंवा सिग्नल यंत्रणेशिवाय ठेवलेले हे ओपनिंग नेमके राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार ‘अधिकृत’ आहे की ठेकेदाराने आपल्या सोयीसाठी पाडलेले ‘अनधिकृत’ ओपनिंग आहे, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. एका बाजूला सुसाट वेगाने धावणारी वाहने आणि दुसऱ्या बाजूला अचानक समोर येणारे हे ‘ओपनिंग’, यामुळे वाहनचालकांचा मोठा गोंधळ उडत आहे.
ठेकेदार कंपनीच्या मनमानीमुळे महामार्ग बनला ‘मृत्यूचा सापळा’
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम करणाऱ्या ‘रवी इन्फ्रा बिल्ड’ कंपनीच्या गलथान कारभारावर वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कंपनीकडून कोणतीही पूर्वसूचना, दिशादर्शक फलक किंवा सुरक्षा उपाययोजना न करता अचानक रस्ते वळवले (डायव्हर्जन) जात आहेत. दुतर्फा वाहतूक एकाच अरुंद मार्गिकेवर सोडल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडत असून, हा महामार्ग जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. यापूर्वीही ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या कंपनीच्या वाहतूक व्यवस्थापनाची सखोल चौकशी करून सदोष मनुष्यवधासारखे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
सुसाट वेगावर लगाम कोणाचा?
या महामार्गाच्या काही मार्गिका खुल्या होताच एसटी बससह अवजड वाहनांचा वेग अनियंत्रित झाला आहे. हातखंबा तिठ्यापासून साळवी स्टॉपपर्यंत रस्त्यालगत वस्ती आणि वाहनांची वर्दळ असतानाही एसटी चालकांसह मोठे वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. एकीकडे ठेकेदाराचा निष्काळजीपणा आणि दुसरीकडे चालकांची बेदरकार वृत्ती, या कात्रीत सामान्य दुचाकीस्वार आणि पादचारी भरडले जात आहेत. आणखी किती निष्पाप बळी गेल्यानंतर प्रशासनाला आणि ठेकेदाराला जाग येणार, असा खडा सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे.


